घरमुंबईसहा वर्षांत 1 हजार 884 बालकांना मिळाली पालकांच्या मायेची सावली

सहा वर्षांत 1 हजार 884 बालकांना मिळाली पालकांच्या मायेची सावली

Subscribe

ठाणे पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटचे यश

अल्पवयीन बालकांवर होणार्‍या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. तर अल्पवयीन मुलांच्या अपहरणाची प्रकरणेही वाढत असल्याने ठाणे पोलिसांनी 10 जुलै 2014 रोजी चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची स्थापना केली. त्याला तब्बल सहा वर्षांचा कालावधी झाला. यादरम्यान या विशेष पथकाने भरीव कामगिरी करीत आतापर्यंत तब्बल 1 हजार 884 अपहृत मुलांना शोधून काढून त्यांना त्यांच्या पालकांच्या मायेच्या सावलीत पाठविण्याची कामगिरी पार पाडली.

ठाणे आयुक्तालयातील इतर गुन्हे हाताळण्याबरोबरच बालक, पालक व बालकांना कामावर ठेवणारे ठेकेदार यांना समुपदेशन करून घरापासून दुरावलेल्या बालकांना त्यांच्या पालकापर्यंत पोहचवण्याचे उल्लेखनीय, मोठे कार्य चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने या वर्षात केले. महिलांवरील अत्याचार प्रकरणी न्याय हक्कासाठी महिला तक्रार निवारण समिती, वाढत्या बालकांवरील अत्याचार निर्मूलन प्रकरणी ठाणे पोलिसांनी 2014 वर्षात जुलै महिन्यात चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची स्थापना करून भरीव कामगिरी केली. बालकांवर होणारे गुन्हे, बालकांच्या समस्या, सुरक्षा यासाठी काम करणारे पोलीस दलातील हे राज्यात पहिलेच युनिट असावे.

- Advertisement -

फक्त बालकांशी संबंधित प्रकरण हाताळण्याचे काम हे युनिट करत आहे. बालकांवर होणारे अन्याय, अत्याचार, अपहरण व मिसिंग केसेस देखील स्वतंत्रपणे हाताळले जाते. चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटचे अधिकारी व कर्मचारी बजावत आहेत.

ठाणे पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटचे यश

असे आहे पथक
या पथकात 2 पोलीस अधिकारी आणि 11 पोलीस कर्मचारी असे पोलीस बल या युनिटमध्ये कार्यरत आहेत. बालकांशी संबंधित मागील पाच वर्षांच्या गुन्ह्याची माहिती विविध पोलीस स्टेशनमधून घेऊन त्यांचा संपूर्ण डेटा तयार करण्याचे काम सद्यस्थितीत हे युनिट करीत आहेत. त्याचप्रमाणे मागील पाच वर्षांत मिसिंग झालेली बालके, अपहरण झालेली बालके, यांची संपूर्ण माहिती व त्यांचे छायाचित्रांचे अल्बम बनवण्याचे काम देखील हे युनिट करत आहे व त्या प्रमाणे बालकांचा शोध घेतला जाणार आहे. तसेच भिक्षा मागणारी मुले यांची देखील संपूर्ण माहिती या युनिटमध्ये ठेवली जाणार आहे.

- Advertisement -

1 हजार 884 निराधार बालकांच्या चेहर्‍यावर ‘मुस्कान’
10 जुलै 2014 रोजी चाईल्ड प्रोटेक्शन युनिट स्थापन झाल्यापासून 2018 पर्यंत या युनिटने 1 हजार 884 निराधार व हरवलेल्या बालकांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहचवले आहे. त्यात 2014 ते 2016 या कालावधीत 1 हजार 36 मुलांना तर 2017 या वर्षात एकूण 248 घरापासून दुरावलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या मायेचे छत्र मिळवून दिले. त्याचप्रमाणे ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने आतापर्यंत सात वेळा ऑपरेशन मुस्कान ही मोहीम राबवून त्या अंतर्गत 937 घरापासून दुरावलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्याची मोलाची कामगिरी बजावली आहे. मिसिंग अथवा अपहरण झालेल्या बालकांच्या पालकांनी आपली तक्रार चाईल्ड प्रोटेक्शन युनिटकडे करावी. तसेच कुणी बालकांवर अन्याय अत्याचार करत असेल अथवा बालकामगार ठेवत असेल, त्यांना भिक्षा मागण्यास भाग पाडत असेल तर त्याची तक्रार युनिटकडे निःसंकोचपणे करावी असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -