घरमुंबईप्रदूषणाच्या विळख्यात ठाणेकरांची घुसमट

प्रदूषणाच्या विळख्यात ठाणेकरांची घुसमट

Subscribe

ठाणे शहरात सामान्य करदात्या व कष्टकरी ठाणेकर नागरिकांना हवा आणि ध्वनी प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील प्रदूषण थांबवून निरोगी व स्वच्छ वातावरण निर्माण व्हावे यासाठी अनेक सामाजिक संघटना वेळोवेळी ठाणे महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र वेगवेगळ्या प्रकल्प आणि योजनांमध्ये अडकलेल्या प्रशासनाला या महत्त्वपूर्ण गोष्टीकडे पहायला वेळ नसल्याने प्रदुषणाच्या विळख्यात ठाणेकरांची घुसमट होत आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात दररोज आठ ते नऊ लाख नागरिकांची वर्दळ असते. वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाशासोबतच मोकळी हवा व शुध्द हवेची गुणवत्ता तसेच सुरक्षितता राखणे हे ठामपाचे प्रथम कायदेशीर कर्तव्य आहे. संमत विकास आराखड्यात नसतानाही केवळ वाहतुकीचे नियोजन व्हावे यासाठी सॅटीस प्रकल्प उभारण्यात आला. परंतु यामुळे नागरिकांच्या वावरण्यावर बंधने आली आहेत. याच पार्श्वभूमीवर सुरक्षा विभागानेदेखील सॅटीसबाबत सुरक्षिततेचे नियम पाळलेले नसल्याचे घोषित केलेलेच आहे.

- Advertisement -

सुमारे दोनशे फुटाहून अधिक वर असलेल्या सॅटीसवर धुळीचा प्रचंड थर साचला आहे. यावरून ठाणे शहरातील प्रदुषणाच्या विळख्यात अडकले असल्याची खात्री पटते. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. अपुरा सूर्यप्रकाश, कोंदट वातावरण, प्रचंड ध्वनीप्रदूषण आणि धुळीचा थर अशा वातावरणात ठाणेकर जीव मुठीत घेऊन जगत आहेत. शहरातील पर्यावरण स्थिती निर्देशांक गुणवत्ता पूर्वक वाढविलाच पाहिजे, हे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचे कायदेशीर कर्तव्य आहे. मात्र ठामपा याला अपवाद ठरत आहे.

सॅटीस प्रकल्पावर प्रवाशांचे ऊन व पावसापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने घुमट बसवण्यात आला. मात्र, या घुमटावर बसविलेल्या पारदर्शक दालनांमधून पुरेसा सूर्यप्रकाश प्रसारित होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर सदर घुमटावर स्वच्छतेबाबत हलगर्जीपण केलेला असल्यामुळे, छतावर पूर्णपणे धुळीचेच साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे सॅटीस प्रकल्प परिसरात किती मोठ्या प्रमाणात तरंगते सूक्ष्म धुलिकण असतील, याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

सॅटीस परिसरात हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा एका इलेक्ट्रॉनिक (डिजिटल) फलकाद्वारे उभारण्यात येऊन, सर्वसामान्य करदाता व कष्टकरी ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे प्राथमिक आणि तितकेच आवश्यक कार्य पार पाडले जावे. हवेची गुणवत्ता कशी राखली जाईल, यादृष्टीने पाऊले उचलणे गरजेचे आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी आता ठाणे महानगरपालिका मुख्यालयात ‘ढोल-ताशा’ वाजवून परिस्थितीचे गंभीर स्वरूप व्यक्त करावे लागेल.
– नितीन देशपांडे, उपाध्यक्ष,धर्मराज्य पक्ष.

पर्यावरण प्रदूषणाबाबत लोकशाही दिनात सतत तक्रारी केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी मा. मुकेश खुल्लर यांनी ठामपाला महत्त्वाचा ठिकाणी पर्यावरणीय तक्ता लावण्याचे आदेश दिले व ते प्रत्यक्षात अनेक चौकात लावले गेले व दर आठवड्याला सरासरी पर्यावरण स्थिती दर्शक अंक दिसत होते. जिल्हाधिकार्‍यांची बदली झाली व नंतर एक एक बोर्ड गायब झाले. याबाबत एकाही नगरसेवकाने आवाज उठवला नाही. दरवर्षी पर्यावरण अहवाल प्रसिद्ध होतो. दरवर्षी पर्यावरण सुधारते असा दावा ठामपा करीत असते. मात्र सॅटीसवर असलेल्या डोमकडे पाहिले की हा दावा फोल ठरतो.
– अनिल शाळीग्राम, सामाजिक विश्लेषक.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -