घरमुंबईमोनोरेलच्या स्टेशनवर सोलार ऊर्जेची झळाळी

मोनोरेलच्या स्टेशनवर सोलार ऊर्जेची झळाळी

Subscribe

१७ स्टेशनांवर ३० टक्के विजेची गरज भागवण्याचा मानस

चेंबूर ते महालक्ष्मी दरम्यान धावणार्‍या मोनो रेल प्रकल्पासाठी सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज वापराचे उद्दिष्ट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठेवले आहे. संपूर्ण मोनोरेल मार्गावरील १७ स्टेशनवर सोलार पॅनेलचा वापर करून ३० टक्के विजेची गरज भागवण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. मोनोरेल प्रकल्प चेंबूर ते महालक्ष्मी दरम्यान संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर या प्रकल्पाची विजेची गरज ही साधारणपणे ७ मेगावॅट इतकी असेल. त्यापैकी ३० टक्के वीज सोलार ऊर्जेचा वापर करून भागवण्यात येऊ शकते, असे एमएमआरडीएला वाटते. त्यामध्ये स्टेशन परिसरातील प्रकाश व्यवस्थेसाठीचे दिवे, लिफ्ट, एक्सेलेटर आधी उपकरणांची विजेची गरज भागवणे शक्य होणार आहे.सध्या टाटा पॉवरकडून संपूर्ण मोनोरेल प्रकल्पासाठी वीज उपलब्ध करून दिली जाते.

सोलार पॅनेल उभारणी, देखभाल व दुरुस्ती हा सगळा खर्च प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी कंपनी करणार आहे. एमएमआरडीए त्या कंपनीसोबत वीज खरेदीचा करार करणार आहे. सौरऊर्जा खरेदी करारासाठी प्रति युनिट ५.१ रूपये इतकी कमाल मर्यादा एमएमआरडीएने निश्चित केली आहे. येत्या १२ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठीचे लक्ष्य एमएमआरडीएने ठेवले आहे. याआधी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन आणि मुंबई मेट्रोने सोलार पॅनेलचा वापर स्टेशनवर केला आहे. पारंपरिक पद्धतीच्या स्त्रोतांमधून वीज निर्मितीपेक्षा सौर ऊर्जा ही स्वस्त आहे. तसेच केंद्र सरकारच्या नूतनशील ऊर्जा विभागाकडून अशा प्रकल्पाच्या उभारणीसाठी सबसिडी दिली जाते. त्यामुळे ही वीज आणखी स्वस्त किमतीत उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

मोनोरेलसाठी लागणार्‍या एकूण विजेपैकी मोठ्या प्रमाणावर विजेची गरज ही अपारंपरिक स्त्रोतांमधून भागवण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी दिली. येत्या एक ते दीड वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसेच एक निविदा पूर्व बैठकही पार पडली आहे. प्राथमिक बैठकीत पाच कंपन्यांनी सोलार पॅनेलचा वापर करून मोनोरेल प्रकल्पासाठी वीज पुरविण्यासाठी रस दाखविला आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -