घरमुंबईमुंबईतील शाळांमध्ये वाढतोय प्रेमरोगाचा ज्वर

मुंबईतील शाळांमध्ये वाढतोय प्रेमरोगाचा ज्वर

Subscribe

गुंतागुंतीच्या प्रकरणामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींचा अभ्यासावर परिणाम

टीव्ही, सिनेमा, मोबाईल यासारख्या झपाट्याने बदलणार्‍या तंत्रज्ञानामुळे शालेय वयातच विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये प्रेमसंबंधाचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी नववी, दहावीमध्ये होणारी प्रेमप्रकरणे आता सहावी, सातवीमध्येच होऊ लागली आहेत. फारच कमी वयात होत असलेल्या प्रेमप्रकरणामुळे अनेक गुंतागुंतीची प्रकरणे होत असून, त्याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. शाळांमधील समुपदेशकांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादातून ही प्रकरणे उघडकीस येत आहेत. परंतु शाळांची बदनामी होण्याच्या भीतीमुळे या नाजूक विषयावर उघडपणे बोलण्याचे धैर्य शाळा दाखवत नसल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

विद्यार्थी-विद्यार्थिनी दहावीमध्ये आल्यावर अनेकांची प्रेमप्रकरणे होत असतात. परंतु सध्या टीव्ही, सिनेमा, मोबाईल, कम्प्युटरच्या वाढत्या वापरामुळे प्रेमप्रकरणाचे हे प्रमाण सहावी, सातवीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे. पौगंडावस्थेतच विद्यार्थ्यांच्या होणार्‍या प्रेमप्रकरणांमुळे अनेक गुंतागुंत निर्माण होऊन त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होताना दिसत आहे. सातवी, आठवीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींमध्ये काही वर्षांपासून प्रेमप्रकरणे होण्याचे प्रमाण वाढले आहे. बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड नसेल तर आपल्यातच काहीतरी उणीव आहे, असा न्यूनगंड त्यांच्यात तयार होतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. काही मुले-मुली तर आवडत्या पार्टनरसाठी चिडवाचिडवीचा अतिरेक करतात. या प्रकाराला वैतागून काही विद्यार्थी शाळेत गैरहजर राहतात, मात्र त्यांच्या पालकांना याची कल्पना नसते, अशी माहिती मुंबईतील दोन प्रतिष्ठित शाळांमध्ये समुपदेशिक म्हणून कार्यरत असलेल्या मानसोपचारतज्ज्ञ प्राजक्ता भाटकर यांनी सांगितले.

- Advertisement -

नववीतील १४ वर्षीय मुलगा काही महिन्यांपासून शाळेत १०-१२ दिवस गैरहजर राहत होता. वारंवार गैरहजर राहत असल्याने शाळेतील शिक्षकांना त्या विद्यार्थ्याची चिंता वाटू लागली. त्यामुळे शाळेतील समुपदेशकांनी त्याच्याशी सवांद साधला असता, तो नाही म्हणत असतनाही शाळेतील एक मुलगी त्याच्यावर प्रेमसंबंधासाठी दबाव टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तिच्या मैत्रिणीला त्याला सतत चिडवायच्या या प्रकाराला वैतागून तो शाळेत गैरहजर राहत असल्याचे त्यांनी समुपदेशकांना सांगितले. त्याचप्रमाणे वर्गातील मैत्रिणींचे प्रेमसंबंध होते, पण आपला कोणीही प्रियकर नसल्याने दहावीतील एका मुलगी सतत चिंतेत असे. बॉयफ्रेंडशिवाय आपले आयुष्य अपूर्ण आहे, या विचारांनी प्रियांकाचे अभ्यासातील लक्ष कमी झाले आणि ती गटांगळ्या खाऊ लागली. अशी अनेक प्रकरणे सध्या विविध शाळांमध्ये घडत आहेत.

पूर्वी आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रेमप्रकरणे व्हायची. पण आता सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांमध्येही असे प्रकार होताना आढळत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आम्ही आमच्या शाळेत मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशकाची नेमणूक केली आहे. हे समुपदेशक शाळेत गैरहजर राहणारे विद्यार्थी, अभ्यासात मागे पडलेले विद्यार्थी किंवा चिडचिड करणारे विद्यार्थी यांच्याशी नियमितपणे संवाद साधतात. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर अनेक विद्यार्थी आपल्या भावनांना वाट करून देतात. त्यामुळे पौगंडवयातील स्वाभाविक नैसर्गिक आकर्षण भावनांना सुयोग्यपणे कसे हाताळावे, याबाबत समुपदेशकांकडून त्यांना मार्गदर्शन करण्यात येते. समुपदेशकांच्या मार्गदर्शनाबरोबरच पालकांनीही त्यांच्याशी मनमोकळेपणे संवाद साधल्यास गुंतागुंत रोखण्यास मदत होऊ शकते, अशी माहिती सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली.

- Advertisement -

पालकांनी त्यांच्या पौगंडवयीन मुला-मुलींशी अत्यंत मोकळेपणाने संवाद साधणे तसेच त्यांच्या मनातील अफेअर-रोमान्स-रिलेशनशीपबाबतच्या अवास्तव कल्पना दूर करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.
– राजेंद्र प्रधान, अध्यक्ष, डी. एस. हायस्कूल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -