घरमुंबईयुतीचा विचार न करता निवडणुकीच्या कामाला लागा - उद्धव ठाकरे

युतीचा विचार न करता निवडणुकीच्या कामाला लागा – उद्धव ठाकरे

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी पक्षबांधणी आणि रणनितीसाठी महत्वाची बैठक घेण्यात आली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करताना म्हणाले की, “भाजपसोबत युती होईल की नाही याचा विचार न करता निवडणुकीच्या कामाला लागा.” मुंबई शहरातील दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार आणि नगरसेवक यांच्या उपस्थितीत दोन लोकसभा मतदारसंघाची रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत उपविभाग प्रमुखांना कडक सूचना दिल्या आहेत. “भाजप सोबत युती होणार की नाही याचा विचार करु नका. निवडणूकीच्या तयारीला लागा. गट प्रमुखांना मतदार यादीवर लक्ष केंद्रीत करायला भाग पाडा. मतदार यादीतील प्रत्येक मतदाराशी संपर्क ठेवा”, असे निर्देश दिले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक उपविभाग प्रमुखाकडून मतदार यादी आणि त्यांच्या भागातील तयारीचा आढावा घेतला. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ज्याप्रकारे आदेश दिले आहेत, त्यानुसार त्यांनी निवडणूकीत एकला चलो चा नारा दिला आहे असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

- Advertisement -

या बैठकीत शिवसेना उपनेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी दोन्ही निवडणूक एकत्र घेता येतील का? याबाबत निवडणूक आयोगाचाच संभ्रम असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या प्रतिक्रिया रोज बदलत आहेत. आधी एकत्र निवडणूक घेण्याबद्दल वक्तव्य केले आणि नंतर निवडणूक एकत्र घेता येणार नाही, असेही वक्तव्य आयोगाने केले. मात्र देशातील दोन व्यक्ती लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे भाष्य सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची नावे न घेता केले. तसेच ईव्हीएम मशीनबाबतही या बैठकीत खल करण्यात आला.

अरविंद सावंत म्हणाले की, “पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. रुपयाचा भाव कोसळत चालला आहे. सरकार ढिम्म आहे. १९९५ साली युती सरकारने मूलभूत गरजेचे भाव स्थिर ठेवले होते, अशी टीका त्यांनी भाजप सरकारवर केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -