घरमुंबईपंतप्रधानांची ‘परीक्षा पे चर्चा’

पंतप्रधानांची ‘परीक्षा पे चर्चा’

Subscribe

सहावीपुढील विद्यार्थ्यांना कार्यक्रम दाखवण्याची सक्ती

परीक्षेच्या काळात विद्यार्थी प्रचंड तणावाखाली असतात. अभ्यास कसा करायचा, नापास झालो तर असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. यासाठी ‘परीक्षा पे चर्चा 2’ कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मंगळवारी देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. सहावी पुढील सर्व विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम दाखवण्याची सक्ती करण्याबरोबरच त्याचा अहवाल तासाभरातच पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्याची सक्तीही शिक्षकांवर करण्यात आली आहे. अन्यथा शिक्षणाधिकार्‍यांना जबाबदार धरण्याचा सूचक इशाराही महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे अहवाल सादर करण्यासाठी शिक्षकांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसमवेत 29 जानेवारीला सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये संवाद साधणार आहेत. हा संवाद डीडी नॅशनल, डीडी न्यूज, डीडी इंडिया या दूरचित्रवाणी वाहिन्यांसह केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची वेबसाइट, पंतप्रधान कार्यालयाची वेबसाइट, यूट्यूब वाहिनी, स्वयंप्रभा, फेसबुक लाइव्हद्वारे प्रसारित केला जाणार आहे. इयत्ता सहावीच्या पुढील विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम दाखवण्यासाठीच्या सुविधा शाळांनी उपलब्ध करून द्याव्यात. माध्यम किंवा इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नसलेल्या दुर्गम ठिकाणी ऑल इंडिया रेडिओवरून होणारे प्रसारण विद्यार्थ्यांनी ऐकवावे. कार्यक्रमाच्या दिवशी वीज जाण्याची शक्यता असल्यास जनरेटरची व्यवस्था करण्याचे आदेशही परिषदेने शिक्षणाधिकारी यांच्यासोबत प्रमुख शैक्षणिक प्रशासकीय यंत्रणांच्या प्रमुखांना दिले आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर तासाभरातच म्हणजे 2 वाजेपर्यंत कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवल्याचा अहवाल https://www.research.net/r/RMMNMDG या लिंकवर भरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच अहवाल वेळेत न मिळाल्यास प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा व्यावसायिक सातत्यपूर्ण विकास संस्थांचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरणार असल्याचा सूचक इशारा देण्यात आला. त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर शिक्षकांना अहवाल भरण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. याबाबत शिक्षकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

तुम्हीही विचारू शकता प्रश्न
‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमामध्ये तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारायचा असल्यास #parikshapecharch या हॅशटॅग सोशल मीडियावरून विचारू शकता. हा प्रश्न व्हीडीओ किंवा लिखित स्वरुपात विचारता येईल. तुमच्या प्रश्नाची निवड झाल्यास पंतप्रधान त्यावर उत्तर देतील

छायाचित्र, चित्रफित बनवण्याचे आदेश
जिल्हास्तर अहवालाचे एकत्रिकरण करून राज्याचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला तीन वाजेपर्यंत सादर करायचा असल्याने अहवाल वेळेतच भरावा तसेच जिल्ह्यात प्रक्षेपण सुरू असल्याबाबतची पाच छायाचित्रे आणि उच्च दर्जाची व्हिडिओ चित्रफित करून ती [email protected] यावर ई-मेल करावी, असेही या परिपत्रकात नमूद केले आहे.

- Advertisement -

पंतप्रधानांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. व्हिडिओ, वर्तमान पत्र, इतर सोशल मीडियाद्वारा संदेश पोहचवणे सहज शक्य आहे. त्यामुळे कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी सक्ती करण्याची आवश्यकता नाही.
– उदय नरे, शिक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -