घरमुंबईराजू शेट्टी अद्याप महाआघाडीच्या दारातच

राजू शेट्टी अद्याप महाआघाडीच्या दारातच

Subscribe

तीन जागांच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय प्रलंबित

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली तरी स्वाभिमान संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप झुलवत ठेवले आहे. या निवडणुकीत स्वाभिमानसाठी तीन जागा सोडण्याचा प्रस्ताव राजू शेट्टी यांनी मांडला होता, मात्र अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे राजू शेट्टी महाआघाडीच्या दारातच ताटकळत उभे असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

या प्रकारामुळे राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना अल्टिमेटम दिला आहे. लोकसभेच्या हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या तीन जागांसाठी स्वाभिमानी पक्ष आग्रही आहे. आघाडीच्या नेत्यांनी दोन दिवसांत याबाबत निर्णय न कळवल्यास स्वाभिमानी १५ जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवेल, असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अगोदरच भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीने झुलवत ठेवले आहे. त्यांची महाआघाडीत येण्याची शक्यता कमी झाली आहे. अशात राजू शेट्टी यांनीही वेगळा मार्ग निवडल्यास महाआघाडीचे स्वप्न भंग पावेल. मात्र, स्वत: काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेच महाआघाडीविषयी पुरते गंभीर नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

- Advertisement -

सुरुवातीला आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करताना स्वाभिमानीने चार जागांची मागणी केली होती. मात्र, नंतरच्या काळात एक जागा कमी करत स्वाभिमानीने हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या जागांवरून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. यापैकी हातकणंगलेच्या जागेसाठी आघाडीच्या नेत्यांनी तात्काळ हिरवा कंदील दाखवला. उर्वरित दोन जागांविषयी आघाडीच्या नेत्यांनी अजूनही आपला निर्णय स्वाभिमानीला कळवलेला नाही. मात्र, आता बराच काल उलटल्यामुळे राजू शेट्टींनी आघाडीच्या नेत्यांना अखेरची मुदत दिली आहे. मुंबईत सोमवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची जागावाटपाबाबत अंतिम बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -