घरक्रीडाशिर्सेकर्स महात्मा गांधी, श्रीसमर्थला जेतेपद

शिर्सेकर्स महात्मा गांधी, श्रीसमर्थला जेतेपद

Subscribe

शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीने पुरुषांमध्ये आणि श्री. समर्थ व्यायाम मंदिराने महिलांमध्ये मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तिसरा क्रमांक पुरुषांमध्ये अमर हिंद मंडळाने आणि महिलांमध्ये शिवनेरी सेवा मंडळाने मिळवला. पुरुषांमध्ये शिर्सेकर्सच्या यामिन खानला तर महिलांमध्ये परांजपे स्पोर्ट्स क्लबच्या आरती कदमला सर्वोत्तम आक्रमकाचा पुरस्कार मिळाला.

गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील महिलांच्या अंतिम सामन्यात श्री. समर्थ व्यायाम मंदिरने परांजपे स्पोर्ट्स क्लबचा ९-८ असा १ गुणाने पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. या सामन्याची दोन्ही संघांनी चांगली सुरुवात केली. त्यामुळे मध्यांतराला समर्थकडे ५-४ अशी अवघ्या एका गुणाची आघाडी होती. मध्यांतरानंतर परांजपेने चांगले पुनरागमन केले. मात्र, अखेरीस त्यांना अवघ्या एका गुणाने पराभवाला सामोरे जावे लागले. बीनीच्या खेळाडू अनुष्का प्रभू (२:१०, ३ मि. संरक्षण आणि १ गडी), साजल पाटील (४:१० मि , २:४० मि. संरक्षण आणि २ गडी), भक्ती धांगडे (२:१०, २:३० मि. संरक्षण आणि १ गडी) समर्थच्या विजयाच्या शिल्पकार होत्या.

- Advertisement -

पुरुषांच्या अंतिम सामन्यात बलाढ्य शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरवर (८-५,१०-५) १८-१० अशी ८ गुणांनी मात केली. पूर्वार्धात ८-१० असे पिछाडीवर पडलेल्या शिर्सेकर्स अकादमीने उत्तरार्धात अप्रतिम खेळ करत हा सामना जिंकला. महात्माच्या अनिकेत पोटे (२:००, २:०० मि.), प्रतिक देवरे (२:२०, १:४० मि.) यांनी संरक्षणाची बाजू सांभाळली, तर यामीन खान (४ गडी), राहूल साळूंके (३ गडी) आणि नितेश रूके (३ गडी) आक्रमणात चमकले. ओम समर्थच्या प्रयाग कनगुटकरने (२:५०, १:३० मि. संरक्षण आणि २ गडी) चांगली झुंज दिली.

स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके :

पुरुष विभाग
सर्वोत्कृष्ट आक्रमक – यामिन खान (शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अकॅडमी)
सर्वोत्कृष्ट संरक्षक – प्रयाग कनगुटकर (ओम समर्थ भारत व्यायाममंदिर)
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू – प्रतिक देवरे (शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अकॅडमी)

- Advertisement -

महिला विभाग
सर्वोत्कृष्ट आक्रमक – आरती कदम (परांजपे स्पो. क्लब)
सर्वोत्कृष्ट संरक्षक – अनुष्का प्रभू (श्री समर्थ व्यायाम मंदिर)
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू – साजल पाटील (श्री समर्थ व्यायाम मंदिर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -