घरमुंबईसमृद्धी महामार्गातील मुख्य अडसर दूर

समृद्धी महामार्गातील मुख्य अडसर दूर

Subscribe

पर्यायी जागेच्या बदल्यात वन विभागाची मंजुरी

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानल्या जाणार्‍या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमीन हस्तांतरणाचे काम पूर्ण होत आलेले असतानाच अलिकडेच वन विभागाने पर्यायी जागेच्या बदल्यात या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या आधी या प्रकल्पाचे भूमीपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दृतगती महामार्गानंतर मुंबई-पुणे ही शहरे एकमेकांच्या अधिक जवळ आली. त्याच पद्धतीने या प्रकल्पानंतर मुंबई-नागपूर हे अंतर सात तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी जमीन देण्यास सुरुवातीच्या काळात शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होता. त्यासाठी ठिकठिकाणी स्थानिकांची आंदोलनेही झाली. मात्र बाजारभावाने जमिनीचा मोबदला शेतकर्‍यांच्या थेट बँक खात्यावर जमा केला जाऊ लागल्याने हळूहळू या प्रकल्पाला असलेला विरोध मावळला. बहुतेक बाधित शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी दिल्या. या व्यवहारात अनेकजण रातोरात कोट्यधीश झाले.

- Advertisement -

ठाण्याच्या जमिनीच्या बदल्यात औरंगाबादमध्ये जमीन
जमीन हस्तांकरण प्रक्रिया पूर्ण होत आली असतानाच वन विभागानेही या प्रकल्पाला परवानगी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील 385 हेक्टर वनजमीन या प्रकल्पात येत आहे. त्याबदल्यात औरंगाबाद जिल्ह्यातील सिलोद तालुक्यातील अंधारी आणि फुलंब्री तालुक्यातील जातवा आणि उमरावती या गावांमधील जागा वन लागवडीसाठी दिली आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या अखत्यारीत असलेली ही महसुली जमीन वन विभागाला सुपूर्द केली आहे.

वृक्ष लागवडीसाठी वन विभागाला 80 कोटी
औरंगाबाद जिल्ह्यात देण्यात आलेल्या पर्यायी जागेवर वृक्ष लागवड करण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने 80 कोटी 41 लाख 25 हजार 757 रुपये संबंधित वन संरक्षकांकडे सुपूर्द केले आहेत. येत्या जुलै महिन्यात या ठिकाणी वृक्ष लागवड सुरू होणार आहे.

- Advertisement -

प्रकल्पाची वैशिष्ठ्ये
मुंबई-नागपूर हे अंतर 812 किलोमीटर असून ते पार करण्यासाठी सध्या 14 तास लागतात. समृद्धी महामार्गाने ते अंतर 700 किलोमीटर इतके होईल. या महामार्गामुळे मुंंबई-नागपूर हे अंतर आठ तासांत कापता येणार आहे. औरंगाबाद इथून मुंबई, नागपूरला जाण्यासाठी चार तास लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार हा रस्ता बांधण्यात येणार आहे. महराष्ट्र रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पावर देखरेख करणार आहे. मुंबईतील जेएनपीटी बंदर आणि नागपूर विमानतळ ही महत्त्वाची केंद्र या रस्त्यामुळे जोडली जातील. विदर्भ आणि मराठवाड्यात या महामार्गामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

असा असेल मार्ग
समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यातून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबई असा या रस्त्याचा प्रवास असेल. राज्यातील पाच महसुली विभाग त्यामुळे प्रभावीत होणार आहेत. त्याचप्रमाणे अप्रत्यक्षपणे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड यांनाही जलद वाहतुकीचा फायदा होणार आहे. जवळपास 26 तालुके आणि 392 गावांचा थेट संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -