घरमुंबईपोलीस अधीक्षकांच्या पथकावर रेती माफियांचा हल्ला; तीन जणांना अटक

पोलीस अधीक्षकांच्या पथकावर रेती माफियांचा हल्ला; तीन जणांना अटक

Subscribe

पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी आपल्या दोन सहकार्‍यांसह वसईतील खार्डी रेती बंदरावर सोमवारी रात्री अचानक छापा मारला.

पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी आपल्या दोन सहकार्‍यांसह वसईतील खार्डी रेती बंदरावर सोमवारी रात्री अचानक छापा मारला. यावेळी एका डंपरचालकाने पोलीस शिपायावर डंपर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचाही प्रयत्न केला. या कारवाईत १५ जेसीबी, एक डंपर, रेती साठा यासह २ कोटी ३५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गौरव सिंग रात्री साडेनऊच्या सुमारास पोलीस शिपाई दिनेश पाटील आणि चालक शिपाई राहुल वळवी यांच्यासह मुंबई अहमदाबाद हायवेवरून मुंबईच्या दिशेने निघाले होते. रस्त्यात त्यांना खार्डी रेती बंदरात बेकायदा रेती उत्खनन आणि विनापरवाना रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. याची खातरजमा करण्यासाठी सिंग थेट बंदरावर पोचले होते.

बंदरावर अचानक पोलीस आल्याची बातमी कळताच डंपर चालक डंपर घेऊन पळून जाऊ लागले. दोन डंपर चालक पळून जाण्यात यशस्वी ठरले. तिसर्‍या डंपर चालकाने पळून जाण्यासाठी पोलीस शिपाई दिनेश पाटील यांच्या अंगावर डंपर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण, सिंग यांच्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या कारवाईत खार्डी रेतीबंदरावर तब्बल ३८८ ब्रास रेती, रेती डंपरमध्ये भरण्यासाठी बारा जेसीबी, एक डंपर मिळून २ कोटी ३५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस शिपायाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी निरज लाला यादव (वय २९, रा. पेल्हार फाटा, वसई), अनिल तुकाराम चव्हाण (वय २६, रा. विरार) आणि सुनिल इंद्रजित चव्हाण (वय २०, रा. वसई) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, खार्डी गावातून रेती बंदरावर जाणारा रस्ता रेती वाहतूक करणार्‍या वाहनांमुळे अतिशय खराब झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी महसूल खात्याने या ठिकाणी छापा टाकून अवैध रेती उत्खनन आणि रेती साठा जप्त केला होता. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसाच्या अंतरात या ठिकाणी पुन्हा बेकायदा रेती उत्खनन आणि रेती वाहतूक सुरू झाल्याने पोलीस आणि महसूल खात्याशी असलेले साटेलोटेही उजेडात आले आहे. विशेष म्हणजे पोलीस अधिक्षकांनी धाड टाकली त्यावेळी ३८८ ब्रास रेती साठा, १५ जेसीबी मशीन, मजूरांना राहण्यासाठी ६२ झोपड्या बांधण्यात आल्याचे उजेडात आले आहे.

अवैध रेती उत्खनन, चोरटी रेती वाहतूक पूर्णपणे बंद होईपर्यंत कारवाई सुुरूच राहणार आहे. जो या कारवाईच्या आड येईल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिला. स्वतः पोलीस अधिक्षकांनी केलेल्या कारवाईमुळे विरार पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांचेही धाबे दणाणले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

उद्धव ठाकरेंनी पुन्हा बोलावली आमदारांची बैठक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -