घरमुंबईतिघांची फाशी कायम

तिघांची फाशी कायम

Subscribe

शक्ती मिल सामुहिक बलात्कारप्रकरणी आरोपींना झालेली फाशीची शिक्षा ही कायद्याच्या चौकटीत बसणार आहे, असे सांगतानाच मुंबई हायकोर्टाने आरोपीच्या वकीलांनी सीआरपीसीचे सुधारीत कलम ३७६(ई) च्या वैधतेला दिलेले आव्हान सोमवारी फेटाळून लावले. त्यामुळे आरोपींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा निश्चित करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच हायकोर्टाचा हा निकाल राज्य सरकारलाही दिलासा देणारा आहे.

मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये २२ ऑगस्ट २०१३ रोजी महिला वृत्त छाया चित्रकारावर पाचजणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पोलिसांनी पाचजणांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघेजण अल्पवयीन गुन्हेगार होते. वृत्त छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या बलात्कारापूर्वी अटक केलेल्या आरोपींपैकी तिघांनी याच शक्ती मिल परिसरात भांडूप येथे राहणार्‍या आणखी एका तरुणीवर देखील सामुहिक बलात्कार केल्याचे तपासात समोर आले होते.

- Advertisement -

पोलीस यंत्रणेकडून आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली व सलीम अन्सारी यांच्यावर वारंवार गुन्ह्याची पुरावृत्ती केल्याप्रकरणी नवीन सुधारित कायदा कलम ३७६ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचजणांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवून त्यांच्यापैकी विजय जाधव, कासीम बंगाली व सलीम अन्सारी यांना सुधारित कायदा कलम ३७६ (ई) प्रमाणे मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती.

मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तिघा दोषींकडून याचिकेद्वारे या सुधारित कायदा दुरुस्तीच्या वैधतेलाच हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते.

- Advertisement -

या याचिकेवर न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु असताना बचावपक्षाच्या वकिलांनी आरोपींची बाजू मांडली. त्यात त्यांनी ’फाशीची शिक्षा ही खुनाच्या गुन्ह्यासाठी अंतिम शिक्षा आहे. बलात्कार म्हणजे मनुष्य हत्या नाही. त्यामुळे या गुन्ह्यासाठी फाशीची सर्वाधिक कठोर शिक्षा निश्चित केली जाऊ शकत नाही’, असा युक्तिवाद आरोपींचे वकील युग चौधरी यांनी केला होता.

सरकारी वकिलांनी मात्र या कायदादुरुस्तीचा बचाव करीत ’बलात्कार हा केवळ शारीरिक हल्ला करणारा नसतो, तर तो खूप मोठा मानसिक आघात देणारा असतो. त्यामुळे अनेकदा पीडितांकडून आत्महत्येचेही प्रयत्न झाल्याचे पहायला मिळतात. न्यायाच्या तराजूत खून व बलात्कार यांची तुलना करता होऊ शकत नाही आणि कायद्याने तसे करताही येत नाही. मात्र, बलात्काराच्या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेतली तर तो खुनापेक्षा गंभीर ठरतो’, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

दोन्ही वकिलांच्या युक्तीवादानंतर हायकोर्टाने आरोपींनी सुधारित कलम ३७६ (ई) ला दिलेले आव्हान फेटाळून लावले. तसेच तिघांच्या फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे आरोपींना सुनावलेली फाशीची शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

निर्भया हत्याकांडानंतर या सामुहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील कलमात सुधारण्यात करण्यात आली आहे. आरोपीकडून वारंवार गुन्ह्याची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला सुधारित कायदा कलम ३७६ (ई) हा लावण्यात येते. या सुधारित कलमात मृत्यूदंडाची तरतूद करण्यात आली आहे. शक्ती मिल सामुहिक बलात्काराच्या दोन घटना घडल्या होत्या. दोन्ही गुन्ह्यातील आरोपी सारखेच असल्यामुळे तपास यंत्रणेनेने प्रथम एका गुन्ह्यात या आरोपीना अटक केली, त्यानंतर या तिघांवर दुसरा गुन्हा दाखल करून सुधारीत कायदा कलम ३७६ (ई ) हा लावण्यात आले होते. या सुधारित कायद्याप्रमाणे तिघांना दोषी ठरवून सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली व सलीम अन्सारी या तिघांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -