घरमुंबईशिशिर शिंदेंची शिवसेनेत घरवापसी !

शिशिर शिंदेंची शिवसेनेत घरवापसी !

Subscribe

'एका हाती झेंडा आणि एका हाती धोंडा घेत मी विधानसभेवर भडका फडकवण्यासाठी सज्ज' असल्याचे सांगत शिशिर शिंदे यांनी शिवसेनेत घरवापसी केली आहे. शिवाय यापूर्वी शिवसेनेवर केलेल्या टीकेबद्दल त्यांनी शिवसैनिकांची माफी देखील मागितली आहे.

मनसेचे नेते आणि माजी आमदार शिशिर शिंदे यांनी शिवसेनेत ‘घरवापसी’ केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी भगवा हाती घेतला. गोरेगावमध्ये शिवसेनेच्या ५२व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात शिशिर शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना ‘एका हाती झेंडा आणि एका हाती धोंडा घेत मी विधानसभेवर भडका फडकवण्यासाठी सज्ज’ असल्याचे शिशिर शिंदे यांनी सांगितले. तसेच यापूर्वी शिवसेनेवर केलेल्या टीकेबद्दल मी शिवसैनिकांची माफी मागतो अशी भावना देखील शिशिर शिंदे यांनी बोलताना व्यक्त केली. शिवसेनेत परत आल्याने  समाधानी असून आता जोमाने काम करेन असे आश्वासन देखाील शिशिर शिंदे यांनी शिवसैनिकांना दिले. शिशिर शिंदे यांनी शिवसेनेत घरवापसी केल्याने ‘माय महानगर’च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

नाराज शिशिर शिंदे शिवसेनेत

‘मनसे’मध्ये नाराज असल्याने शिशिर शिंदे यांनी शिवसेनेत घरवापसी केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीती प्रक्रियेपासून दूर ठेवल्याने शिशिर शिंदे मनसेतील काही नेत्यांवर नाराज होते. त्यानंतर दुखावले गेलेले शिंदे यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून ‘मनसे नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा’ अशी विनंती केली होती. पण, शिंदे यांच्या पत्राला राज ठाकरे यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. शिवाय, मनसेच्या विभागांमध्ये होणाऱ्या बैठकांपासून, कार्यक्रमांपासून शिशिर शिंदे यांना दूर कसे ठेवता येईल? याची पुरेपूर काळजी राज ठाकरे यांनी घेतली होती. परिणामी, शिशिर शिंदे यांच्या मनात अस्वस्थता खदखदत होती. त्यानंतर नाराज शिशिर शिंदे यांनी दिलीप लांडे यांच्या मुलाच्या लग्नात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत हतबलता व्यक्त केली होती.

शिशिर शिंदे यांची राजकीय कारकीर्द

  • ६४ वर्षीय शिशिर शिंदे यांनी शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरूवात
  • १९९२ साली शिंदे मुलुंडमधून शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले
  • काही काळानंतर शिशिर शिंदे यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड
  • १९९१ साली पाकविरूद्धच्या क्रिकेट सामन्यात वानखेडे मैदानावरील खेळपट्टी उखडण्यात शिंदे यांचा पुढाकार
  • १९९६ ते २००२ या काळात विधानपरिषदेचे सदस्यपद
  • २००६ साली शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत ‘मनसे’मध्ये प्रवेश
  • २००९च्या लोकसभा निवडणुकीत पराभव
  • २००९च्या विधानसभा निवडणुकीत ‘मनसे’कडून आमदार म्हणून विजयी
  • विधानसभेत ‘सपा’चे आमदार अबू आझमी यांनी हिंदीमध्ये शपथ घेतल्याने मारहाण; त्यानंतर ४ वर्षांसाठी शिंदे
  • यांच्यावर निलंबनाची कारवाई
  • १९ जून २०१८ रोजी शिवसेनेत पुन्हा प्रवेश
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -