घरमुंबईखासदारांनाही महावितरणाकडून 440 वोल्टचा शॉक

खासदारांनाही महावितरणाकडून 440 वोल्टचा शॉक

Subscribe

बंद घराचे बील 22 हजार

वसई: खासदार राजेंद्र गावित यांच्या बंद घराला 22 हजार रुपयांचे बिल देवून वीज मंडळाच्या महावितरण कंपनीने त्यांनाही 440 वोल्टचा शॉक दिला आहे.वसई तालुक्यातील ग्राहकांच्या वीज मंडळाबाबत असलेल्या तक्रारी जाणून घेण्यासाठी रविवारी वसईत खा. गावित यांनी एका बैठकिचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित ग्राहकांनी महावितरणाच्या महाचुकांचा पाढा वाचला. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असतानाही येणारी भरमसाठ बिले, अनियमीत व कमी दाबाने होणार्‍या पुरवठ्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नादुरुस्त होणे, उशीरा मिळणारी सदोष बिले, कर्मचार्‍यांची अरेरावी, वीजचोरीकडे दुर्लक्ष अशा अनेक त्रुटी यावेळी मांडण्यात आल्या. या प्रश्नांना उत्तरे देताना महावितरणाच्या अधिकार्‍यांची दमछाक झाली. त्यामुळे एका महिन्यात या प्रश्नांचे निरसन करा आणि पुढील बैठकीत त्याचा अहवाल सादर करा, असा सज्जड इशारा यावेळी गावित यांनी दिला.

वास्तव बिलांबाबतही त्यांनी अधिकार्‍यांना फैलावर घेतले. पालघरयेथील माझे घर गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे. तरीही या बंद घरात न वापरलेल्या विजेचे बील 22 हजार रुपये इतके पाठवण्यात आल्याचे त्यांनी यावेळी अधिकार्‍यांना ठणकावले. महावितरणाचे अधिक्षक अभियंता दिनेश अग्रवाल, कार्यकारी अभियंता सुर्यकांत महाजन यावेळी उपस्थित होते. राजन नाईक, दत्ता नर, मनोज पाटील, किरण भोईर, शाम पाटकर या भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी ही सभा चालवण्यास खा.गावित यांना सहकार्य केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -