घरमुंबईदहिसरमधील स्कायवॉक बंद

दहिसरमधील स्कायवॉक बंद

Subscribe

एमएमआरडीएच्या नियोजन शुन्य कारभाराचा नमुना

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दहिसर पूर्वेकडील स्कायवॉक बंद केल्यानंतर नागरिकांच्या मागणीनुसार पश्चिमेकडील स्कायवॉकही बंद करण्यात आला. दोन्ही स्कायवॉकचा वापर नागरिकांकडून होत नसल्याने ते बंद करण्याची वेळ महापालिकेकवर आल्याने स्कॉयवॉक बांधण्याबाबत एमएमआरडीएच्या नियोजन शून्य कारभार उघड झाला आहे.

दहिसर पूर्व आणि पश्चिमेकडे एमएमआरडीएकडून स्कायवॉक उभारण्यात आले. परंतु स्कायवॉकचा वापर नागरिकांऐवजी प्रेमीयुगुलांकडून अधिक होऊ लागला. स्कायवॉकचा पादचार्‍यांऐवजी प्रेमीयुगुलांकडून वापर होत असल्याने पश्चिमेकडील स्कायवॉक बंद करण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत होती. शिवसेना आमदार विलास पोतनीस, स्थानिक शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्यासह रहिवाशांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन स्कायवॉक बंद करण्याची मागणी केली. यावेळी आयुक्तांनी स्कायवॉकचा किती वापर होतो याचा अहवाल तयार करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. अहवाल आल्यानंतर आयुक्तांनी पश्चिमेकडील स्कायवॉक बंद केला. त्याचप्रमाणे पूर्वेकडील स्कायवॉकच्या लाद्या उखडल्याने त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पूल विभागाने बनवला होता.

- Advertisement -

त्यानुसार दुरुस्तीसाठी कंत्राटदाराची निवड केली. परंतु सीएसएमटीजवळील पादचारी पुलाची दुघर्टना घडल्यानंतर पूल विभागाने हा स्कायवॉक काही दिवसांपूर्वी बंद केला. दोन्ही स्कायवॉक महापालिकेच्या ताब्यात असले तरी याची बांधणी एमएमआरडीएने केली आहे. रेल्वे स्थानकाशेजारी स्कायवॉक बांधूनही त्याचा वापर पादचार्‍यांसाठी होत नसल्याने हे स्कायवॉक बांधण्यापूर्वी एमएमआरडीएकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नसल्याचे उघड झाले आहे. प्रवाशांच्या वापराविनाच स्कॉयवॉक बंद झाल्याने एमएमआरडीएचे नियोजन शून्य कारभारावर स्थानिकांकडून टीका करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -