घरमुंबईठाण्यातील क्लस्टर योजनेला गती

ठाण्यातील क्लस्टर योजनेला गती

Subscribe

कोपरी, राबोडी, हाजुरी, लोकमान्यनगरची प्राथमिक यादी जाहीर

क्लस्टर योजनेला गती देण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने कोपरी, राबोडी, हाजुरी आणि लोकमान्यनगर येथील मिळकतधारक-भोगवटादारांच्या प्राथमिक याद्या हरकती आणि सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहेत. दरम्यान, किसननगरचे क्षेत्रफळ आणि भोगवटादारांची संख्या जास्त असल्याने त्या ठिकाणचे बायोमेट्रीक सर्वेक्षण 12 मार्चपासून करण्यात येणार असून, किसननगर आणि टेकडी बंगला येथील बायोमेट्रीक सर्वेक्षण युद्धपातळीवर पूर्ण करून त्याची प्राथमिक यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. महापालिकेच्यावतीने नागरी समूह विकास योजनेंतर्गत दिनांक 9 मार्च रोजी कोपरी युआरपी क्र.1, राबोडी येथील युआरपी क्र.3, हाजुरी येथील युआरपी क्र. 11 व लोकमान्यनगर येथील युआरपी क्र.13 मधील भोगवटादाराची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

कोपरी, राबोडी, हाजुरी, लोकमान्यनगर येथील नागरी पुनरुत्थान आराखडे उच्चाधिकार समितीने मंजूर केले असून, हे आराखडे समूह विकास योजनेच्या हद्दीमधील भोगवटादाराच्या बांधकामाच्या क्रमांकासहित क्लस्टर कक्ष, संबंधित प्रभाग समिती कार्यालये तसेच महपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे मिळकतधारकास-भोगवटाधारकास बंधनकारक राहणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, एकाच नावाने कर आकारणी असलेल्या परंतु कर आकारणींतर्गत एकापेक्षा जास्त सदनिकांकरता कर आकारणी असलेल्या मिळकतींकरता(चाळ वा बहुमजली इमारती) संबंधित भोगवटादारांने आवश्यक ती कागदपत्रे क्लस्टर कक्ष, संबंधित प्रभाग समिती येथे व्यक्तीगत नावे समाविष्ट करणेकरता अर्ज करणे आवश्यक आहे. मिळकतीमधील ज्या मिळकत मालकांच्या, इमारतीमध्ये सध्या राहत असलेल्या ज्या भोगवटादारांच्या नावांच्या नोंदी कर आकारणी व मालमत्ता कराच्या बिलामध्ये नाहीत, त्यांच्या नावांच्या नोंदी या यादीमध्ये अंतर्भूत करण्याकरता संबंधितांनी आवश्यक ती कागदपत्रे पुराव्यासहीत क्लस्टर कक्ष, संबंधित प्रभाग समिती येथे अर्ज करणे आवश्यक आहे, तसेच ज्या मिळकतींवर अद्याप मालमत्ता कर आकारणी झालेली नाही, त्या मिळकतधारकांनी दि.4 /3/2014 पूर्वीचे बांधकाम व वास्तव्याच्या पुराव्यासहित क्लस्टर कक्ष संबंधित प्रभाग समिती येथे कर भरून त्याच्या पुराव्यासह अर्ज करणे आवश्यक आहे, तसेच ज्या मिळकतीमध्ये मिळकतीच्या वापरात बदल झाला आहे, त्या मिळकतीचे वापरात बदलाबाबतचे आवश्यक ती कागदपत्रे पुराव्यासहित क्लस्टर कक्ष, संबंधित प्रभाग समिती येथे कर भरुन अर्ज करणे आवश्यक आहे.

ज्या मिळकतधारकांच्या बांधकामाची नोंद प्रसिध्द करण्यात येणार्‍या प्राथमिक यादीमध्ये तसेच आराखड्यामध्ये नाहीत, त्या मिळकतधारकांची यादीमध्ये नोंद होण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे पुराव्यासहीत क्लस्टर कक्ष, संबंधित प्रभाग समिती येथे अर्ज करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या अभिलेखानुसार अधिकृत असलेल्या इमारतींमधील, मिळकतीमधील भोगवटाधारकांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला नाही. अशा भोगवटाधारकांना नागरी समूह योजनेमध्ये समाविष्ट होण्याची इच्छा असल्यास त्यांनी त्यांचे संमतीपत्रासह तसेच आवश्यक त्या पुराव्यासहीत क्लस्टर कक्ष, संबंधित प्रभाग समिती येथे अर्ज करणे आवश्यक असेल.

- Advertisement -

मिळकतधारकांचे, भोगवटादारांचे नाव अंतिम यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी त्यांचे मिळकतीवर दि.4/3/2014 पूर्वीची मालमत्ता कर आकारणी तसेच वास्तव्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. मिळकतधारकांचे, भोगवटादारांचे नाव अंतिम यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी मिळकतधारकाने, भोगवटादाराने त्यांच्या मिळकतीची मालमत्ता कराची, पाणी बिलाची देय रक्कम संपूर्ण भरणे आवश्यक आहे. अन्यथा मालमत्ताधारक-भोगवटाधारक यांचा समावेश अंतिम पात्रता यादीत होणार नाही, तसेच ज्या भोगवटाधारकांची नावे यादीत समाविष्ट आहेत व ज्यांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण झालेले नाही त्यांनी क्लस्टर कक्ष, संबंधित प्रभाग समिती येथे कार्यालयीन वेळेत वास्तव्याच्या पुराव्यासहित बायोमेट्रीक सर्वेक्षणाकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

तथापि किसननगर येथील यु.आर.पी.क्र.12 येथील नागरी समूह योजनेचे आराखडे उच्चाधिकार समितीने मंजूर केलेले असून, आराखड्यामधील भोगवटाधारकांची प्राथमिक यादी करण्याचे काम सुरू आहे. यु.आर.पी. मधील भोगवटाधारकांची मोठी संख्या लक्षात घेता प्राथमिक यादी शीघ्रगतीने अंतीम करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवरील भोगवटाधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षणाचे काम महापालिकेच्यावतीने दि.12/03/2019 पासून सुरू करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे टेकडी बंगला येथेही बायोमेट्रीक सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून किसननगर व टेकडी बंगला येथील भोगवटादारांची प्राथमिक यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. असे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -