घरमुंबईडोंबिवलीच्या रिक्षा स्टँडवरून शिवसेना भाजपमध्ये जुंपली

डोंबिवलीच्या रिक्षा स्टँडवरून शिवसेना भाजपमध्ये जुंपली

Subscribe

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पार्किंग प्लाझाच्या कॉम्पलेक्समध्ये रिक्षा स्टँड हलविण्यासाठी डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे आग्रही आहेत. तसे आदेशच त्यांनी संबधित यंत्रणाला दिले होते. मात्र चव्हाणांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे दिसून येत आहे. बेसमेंटमध्ये रिक्षा हलविण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने दुसऱ्यांदा स्थगित केल्यामुळे राज्यमंत्री चव्हाणांना शिवसेनेकडून शह दिला जात असल्याचे दिसून येत आहे.

डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौक हा सर्वात महत्वाचा चौक म्हणून ओळखला जातो. इथल्या चारही रस्त्यांवर रिक्षा स्टँड, बस स्टँड असल्याने या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. काही दिवसांपूर्वीच राज्यमंत्री चव्हाण यांनी पालिका अधिकारी आरटीओ वाहतूक पोलीस यांच्यासह पाहणी दौरा केला होता. या परिसरातील अनेक ठिकाणी रिक्षा स्टँड असल्याने हे रिक्षा स्टँड एकाच ठिकाणी हलविले गेले तर वाहतूक कोंडी कमी होईल असा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यावेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी हे रिक्षा स्टँड पाटकर प्लाझा पाकिँगच्या बेसमेंटमध्ये हलविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार पालिकेने बॅरीगेटस खरेदीचा प्रस्ताव तयार करून शनिवारच्या स्थायी समितीकडे मंजूरीसाठी पाठवला होता. मात्र दुसऱ्यांदा हा प्रस्ताव स्थायी समितीने स्थगित ठेवला आहे. सभापती दिपेश म्हात्रे यांनी स्थगित ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्यमंत्री चव्हाण यांच्या ओदशाला खीळ बसल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -
हे वाचा – #BigBreaking जैश ए मोहम्मदचा दहशतवादी मसूद अजहरचा कर्करोगाने मृत्यू?

सभापतींचे म्हणणे काय आहे

या जागेचे आरक्षण हे पार्किंगसाठी आहे. त्या जागेवर रिक्षा स्टँड केल्यास तसा आरक्षणात बदल करावा लागेल. आरक्षणात बदल करायचा असल्यास महासभेची मान्यता घ्यावी लागेल, असे स्थायी समितीचे सभापती दिपेश म्हात्रे यांनी सांगितले

काय आहे राजकारण

डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. रविंद्र चव्हाण हे डोंबिवलीतून दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले होते. भाजपकडून रविंद्र चव्हाण तर शिवसेनेकडून दिपेश म्हात्रे हे रिंगणात होते. त्यामुळे चव्हाण आणि म्हात्रे यांच्यामध्ये चांगलीच लढत झाली होती. चव्हाण यांना ८३,८७२ तर म्हात्रे यांना ३७,६४७ मते मिळाली होती. त्यामुळे चव्हाण आणि म्हात्रे हे एकमेकांचे राजकीय स्पर्धकही आहेत. त्यामुळेच पार्किंग प्लाझाचा प्रस्ताव लटकून पडल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -