घरमहाराष्ट्रआचारसंहितेअगोदर शिवसेनेला विकास कामांच्या लोकार्पणाची लगीनघाई

आचारसंहितेअगोदर शिवसेनेला विकास कामांच्या लोकार्पणाची लगीनघाई

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला विकास कामांची लगीनघाई झालीआहे, असे जाणवत आहे. रविवारी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याा हस्ते ठाणे जिल्ह्यात विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.

आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे त्याअगोदरच विकास कामांच्या लोकार्पणाचा आणि उद्घाटनांचा धडका शिवसेनेने लावला आहे. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी दिवा, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर शहराचा दौरा केला. तेथील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमीपुजन त्यांनी केले. त्यामुळे आचारसंहितेअगोदरच विकास कामांच्या उद्घाटनाची शिवसेनेची लगीनघाई दिसून आली.

या कामांचे झाले लोकार्पण

उल्हासनगर येथील कामगार रुग्णालयाचा पुनर्विकास होत असून १२५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन, रेल्वे सेवा गतिमान करण्यासाठी आणि रेल्वे अपघात टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दिवा येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन तसेच खासदार निधीच्या माध्यमातून डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी डोंबिवली येथील सावळाराम क्रीडा संकुलात विकसित केलेली क्रिकेट खेळपट्टी आणि कल्याण पूर्व येथे बांधलेल्या दोन वाचनालयांच्या लोकार्पण तसेच ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पडले गावात ४ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या तीर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे भूमिपूजन अशा सर्वच कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सुभाष भोईर, रवींद्र फाटक, डॉ. बालाजी किणीकर, माजी आमदार कुमार आयलानी, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, ठाणे महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, सभागृह नेते श्रेयस समेळ, महानगरप्रमुख विजय साळवी, कल्याणचे शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, डोंबिवलीचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उल्हासनगरचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उल्हासनगर महापालिकेतील विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, यांच्यासह स्थानिक नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

उल्हानगरचे १०० खाटांचे अद्ययावत रूग्णालय

उल्हासनगर येथे कामगार रुग्णालयाची इमारत आणि १२ निवासी इमारती जीर्ण झाल्याचा अहवाल मुंबईतील आयआयटी संस्थेने दिला होता. त्यामुळे त्या इमारती पाडून त्या जागेवर नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. खासदार शिंदे यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार केंद्र शासनाने १२५ कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी मंजूर केला असून जुन्या रुग्णालयाच्या जागी १०० खाटांचे अद्ययावत, सुसज्ज रुग्णालय होणार आहे.

दिवा रेल्वे उड्डाणपुलामुळे दिलासा

दिवा रेल्वे स्थानकालगत असलेल्या फाटकामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर विपरित परिणाम होतो. तसेच रेल्वे रुळ ओलांडताना अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली होती. परंतु, तो विविध कारणांमुळे रखडला होता. त्यातील अडथळे दूर झाले असून ३९ कोटी रुपयांच्या या कामाला आता सुरुवात होत आहे.

- Advertisement -

क्रिकेट खेळपट्टी, वाचनालयांचे लोकार्पण

कल्याण आणि डोंबिवली परिसरातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना सरावासाठी उत्तम सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ठाणे आणि मुंबईपर्यंत जावे लागते. क्रिकेटचे मोठे किट घेऊन लोकलने प्रवास करणे जिकिरीचे असल्यामुळे उदयोन्मुख क्रिकेटपटूंची गैरसोय दूर करण्यासाठी डॉ. शिंदे यांनी खासदार निधीतून ४५ लाख रुपये खर्च करून डोंबिवली येथील सावळाराम क्रीडा संकुलात चार खेळपट्ट्या विकसित केल्या आहेत. तसेच खासदार निधीतून कल्याण पूर्व येथील लोकग्राम, तसेच नेतिवली येथे दोन वाचनालये बांधण्यात आली आहेत. मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढावी, तसेच दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये त्यांना अभ्यासासाठी हक्काचे ठिकाण मिळावे, यासाठी लोकग्राम येथील वाचनालयासाठी एकूण ५३ लाख रुपयांचा खर्च आला असून नेतिवली वाचनालयासाठी ४८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या दोन्ही वाचनालयांसाठी विधान परिषदेचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनीही आमदार निधीतून साह्य केले आहे. तसेच पडले गावातील तिर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी सभागृह नव्याने बांधण्यात येत आहे. यासाठी सुमारे ४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -