घरमुंबईचेंबूरमध्ये जमावाकडून रास्ता रोको

चेंबूरमध्ये जमावाकडून रास्ता रोको

Subscribe

बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास पोलीस अपयशी,रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या पित्याच्या अंत्ययात्रेत दगडफेक

सतरा वर्षांच्या अल्पवयीन बेपत्ता मुलीचा शोध घेण्यास पोलीस अपयशी ठरले. वारंवार विनंती करुनही पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हताश झालेल्या पंचाराम रिठाडिया या 40 वर्षांच्या पित्याने लोकलखाली आत्महत्या केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. पंचारामच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने स्थानिक रहिवाशी सहभागी झाले होते. अंत्ययात्रा सुरु असताना संतप्त जमावाने अचानक रास्ता रोको करुन दगडफेक केल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या रास्ता रोको आणि दगडफेकीमुळे वाहतूक सेवेवर प्रचंड परिणाम झाला होता. जमावाने पोलिसांच्या वाहनांना टार्गेट केल्याने पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. रात्री उशिरा तिथे शांतता असली तरी पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रकरणी रास्ता रोको आणि दगडफेक करुन सरकारी वाहनांचे नुकसान करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून काही संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

पंचाराम रिठाडिया हे चेंबूरच्या ठक्करबाप्पा कॉलनीत राहत असून त्यांची मुलगी काही दिवसांपासून मिसिंग होती. याबाबत त्यांनी नेहरुनगर पोलिसांत तिच्या मिसिंगची तक्रार केली होती. मात्र पोलिसांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. प्रत्येक वेळेस त्यांना पोलीस ठाण्यात अपमनास्पद वागणूक दिली जात होती. आपली मुलगी सापडणार की नाही याचे काही उत्तर पोलिसांकडून मिळत नव्हते. या मुलीला शोधून काढण्यात पोलिसांना सपशेल अपयश आले होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून पंचाराम यांनी गेल्याच आठवड्यात टिळकनगर रेल्वे स्थानकात लोकलखाली येऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. त्यांचा मृतदेह नंतर त्यांच्या नातेवाईकांना सोपविण्यात आला होता.

मंगळवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा निघाली होती. यावेळी स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही अंत्ययात्रा चेंबूर येथील उमरशी बाप्पा चौकाजवळ आली असता काही लोकांनी रस्त्यावर बसून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांच्या विरोधात जोरात घोषणाबाजी केली. यावेळी तिथे पोलीस बंदोबस्त असल्याने पोलिसांनी रास्ता रोको करणार्‍या लोकांची समजूत काढून कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही असे कोणतेही कृत्य करु नका अशी विनंती केली. मात्र संतप्त लोकांनी पोलिसांचे काहीही ऐकले नाही. त्यांच्यात पोलिसांविषयी प्रचंड चीड होती. त्यामुळे काही लोकांनी तिथे अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली होती. दगडफेकीच्या घटनेने परिसरातील वातावरण प्रचंड तंग झाले होते. दगडफेकीत काही पोलिसांना दुखापत झाली तर पोलीस वाहनांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या वाहनांमध्ये पोलीस व्हॅनसह टॅक्सी, रिक्षा, कार आणि दहाहून बाईकचा समावेश आहे.

- Advertisement -

जमाव प्रचंड आक्रमक झाला होता. समजूत घालूनही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी बळाचा वापर करुन दगडफेक आणि रास्ता रोको करणार्‍या लोकांवर लाठीमार केला. यावेळी स्थानिक रहिवाशी आणि पोलिसांमध्ये प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करुन तिथे अधिक पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. काही वेळानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह तिथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पाठविण्यात आला होता. संतप्त जमावाची पोलिसांनी समजूत काढून वाहतूक सेवा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला.

या संपूर्ण घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. रात्री उशिरा रास्ता रोको आणि दगडफेक करुन सरकारी कामात अडथळा आणणे तसेच पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यात काहींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु आहेत. त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान दगडफेकीच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने तिथे रात्री उशिरा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आरोपीने धमकावले तरीही पोलीस गप्प होते
आमची मुलगी बेपत्ता झाली, मात्र त्यानंतर काहीच कारवाई करण्यात आली नाही. आम्ही स्थानिक पोलिसांपासून वरिष्ठांपर्यंत न्यायासाठी गेलो. मात्र, आम्हाला न्याय मिळाला नाही. मुलीचा तपास लागावा म्हणून प्रयत्न करुनही मुलगी न मिळाल्याने आणि आरोपींनी धमकावल्याने माझ्या पतीने आत्महत्या केली. त्यानंतर आम्ही आरोपींवर कारवाई व्हावी म्हणून त्यांचा मृतदेह 10 दिवस तसाच ठेवला. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, 10 दिवस होऊनही कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर आज त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. दोषी पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी मुलीच्या आईने वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -