घरमुंबईआश्रमावर कारवाईसाठी प्रशासनाची जोरदार तयारी

आश्रमावर कारवाईसाठी प्रशासनाची जोरदार तयारी

Subscribe

सुमारे 900 पोलिसांचा फौजफाटा,पर्वतावर जाणारे रस्ते बंद

वसईतील तुंगारेश्वर पर्वतावर असलेल्या बालयोगी सदानंद महाराज यांच्या आश्रमावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारीनिशी आजपासून मैदानात उतरले आहे. सुमारे नऊशेहून अधिक पोलीस, जेसीबीसह वनखात्याचे अधिकारी सकाळीच पर्वतावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पर्वतावर येणारे सर्व मार्ग पोलिसांनी बंद करून भक्तांना पर्वतावर जाण्यापासून रोखून धरले. प्रमुख कार्यकर्त्यांना प्रतिबंधकात्मक कारवाईच्या नोटीसा पाठवून त्यांची धरपकड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अनेक कार्यकर्ते भूमीगत झाले आहेत.

सुप्रीम कोर्टाने तुंगारेश्वर पर्वतावरील बालयोगी सदानंद महाराज यांच्या आश्रमावर येत्या 31 ऑगस्टपर्यंत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वनखात्याने आश्रमाला नोटीस बजावली होती. तसेच पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. ही कारवाई होऊ नये याासाठी आश्रम बचाव समितीने आंदोलनाचा मार्ग अवलंबवला होता. त्यामुळे सावध झालेल्या प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.

- Advertisement -

सोमवारी दुपारी विरार पश्चिमेकडील म्हाडा कॉलनीत शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस दलासह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथून मोठा पोलीस फौजफाटा जमा झाला होता. हा फौजफाटा सोमवारी रात्रीच तुंगारेश्वर पर्वतावर रवाना करण्यात आला होता. तसेच काल संध्याकाळी जेसीबी मशिनही पर्वतावर पोचते झाले होते. तर कारवाईच्या दोन दिवस आधी पोलिसांनी आश्रम बचावसाठी पुढाकार घेणार्‍या असंख्य कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. तसेच काही जणांची धरपकड करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. याची कुणकुण लागताच अनेक जण रविवारपासूनच भूमीगत झाले आहेत.

कारवाई होणारच याची खात्री झाल्यानंतर सदानंद महाराज यांनी स्वतः पुढाकार घेऊन आक्षेपार्ह असलेली इमारत सोमवारी सकाळपासून पाडायला सुरुवात केली होती. यावेळी असंख्य भक्त त्याठिकाणी हजर होते. असे असले तरी वनखात्याने आपली कारवाई सुुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंगळवारी पर्वतावर पोलिसांच्या ताफ्यात वनखात्याचे अधिकारी पोचले होते. मंगळवारी सकाळी भक्त पर्वतावर जाण्यासाठी निघाले असता सर्व रस्ते पोलिसांनी बंद केल्याचे दिसून आले. पोलिसांनी पर्वतावर जाण्यापासून सगळ्यांनाच मज्जाव केला होता. तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींनाही पर्वतावर जाण्यापासून रोखण्यात आले होते. त्यामुळे पर्वतावर नेमकी काय कारवाई सुुरु आहे याची माहिती संध्याकाळपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -