घरगणेशोत्सव २०१९गणपती सुट्ट्या नाकारणार्‍या शाळांना दणका

गणपती सुट्ट्या नाकारणार्‍या शाळांना दणका

Subscribe

शिक्षण उपसंचालकांनी निरिक्षकांना दिले कारवाईचे निर्देश

मुंबईतील अनेक इंग्रजी शाळांनी गणेशोत्सवाची सुट्टी नाकारल्याचे प्रकरण मंगळवारी उघडकीस आणल्यानंतर याप्रकरणी शिक्षण उपसंचालकांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी शाळांवर कारवाईचे करण्याचे संकेत देताना यासंदर्भात विभागीय शिक्षण निरिक्षकांना त्यासंदर्भातील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुट्टी नाकारणार्‍या शाळांचे धाबे दणाणाले असून अनेकांनी मंगळवारीच शाळांना सुट्टी जाहीर करण्याची घोषणा केल्याची माहिती मुंबईतील अनेक पालकांनी दिली आहे.

मुंबईतील अनेक इंग्रजी प्रामुख्याने कॉनव्हेंट शाळांनी गणेशोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांना सुट्टी नाकारल्याचे प्रकरण सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी उपस्थित केले. याप्रकरणी पेडणेकर यांनी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याकडे धाव घेत कारवाई करण्याची मागणी देखील केली. याची शिक्षणमंत्र्यांनी गंभीर दखल घेत संबंधितांना लक्ष घालण्याची सूचना केली होती. त्यानुसार मंगळवारी मुंबईतील शिक्षण उपसंचालकांनी याप्रकरणी मुंबई आणि उपनगरातील सर्व शिक्षण निरिक्षकांना तात्काळ आदेश देत गणपती सुट्ट्यांबाबतच्या ८ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. शिक्षण उपसंचालकांच्या या निर्णयामुळे पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून अनेक शाळांनी नाकारलेल्या सुट्टीचा निर्णय मंगळवारी रद्द करण्यातच धन्यता मानल्याची माहिती पालकांकडून यावेळी ‘आपलं महानगर’ला देण्यात आली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात बोलताना चेतन पेडणेकर म्हणाले की, मुंबईतील काही शाळांनी गणपती दरम्यान सुट्ट्या नाकारल्याचे प्रकरण आमच्याकडे आल्यानंतर आम्ही या शाळांना देखील भेट दिली होती. त्यात अनेक शाळांनी सुट्ट्या नाकारल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यामुळेच शिक्षणमंत्र्यांची भेट घेत याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी आम्ही केली होती. काही शाळा हे प्रकार जाणीवपूर्वक करतात. त्यामुळेच आम्ही या शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. शिक्षण उपसंचालकांनी दिलेल्या आदेशानंतरही जर काही शाळांनी सुट्ट्या नाकारल्या तर येत्या काळात मनसे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -