घरमुंबईएकतर्फी प्रेमातून कॉलेज तरुणाची हत्या

एकतर्फी प्रेमातून कॉलेज तरुणाची हत्या

Subscribe

सुशीलकुमार वर्मा हा १७ वर्षांचा तरुण नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये गेला होता. तो लेक्चरला वर्गात जाणार इतक्यात सुशीलला ओळखणार्‍या एका तरुणाने त्याला कॉलेजच्या बाहेर बोलावले. आपल्या पुढे काय वाढून ठेवले याची कल्पनाही केली आहे.

सुशीलकुमार वर्मा हा १७ वर्षांचा तरुण नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये गेला होता. तो लेक्चरला वर्गात जाणार इतक्यात सुशीलला ओळखणार्‍या एका तरुणाने त्याला कॉलेजच्या बाहेर बोलावले. आपल्या पुढे काय वाढून ठेवले याची कल्पनाही नसलेला सुशीलकुमार त्या तरुणासोबत कॉलेजबाहेर गेला. इतक्यात तोंडाला फटके बांधून आलेल्या सहा अल्पवयीन तरुणांनी त्याला घेरले. त्याला लाथाबुक्क्याने मारहाण करत, त्याच्यावर चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली. सुशीलकुमार ओरडत होता. पण त्याच्या मदतीला कोणीही आले नाही.
अखेर तेथेच तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही घटना भांडुपच्या रामकली ज्युनिअर कॉलेजच्या आवारात घडली. एकतर्फी प्रेमातून नशेत असलेल्या या तरुणांनी प्रेयसीच्या प्रियकरालाच संपवले. सुशीलकुमार सध्या भांडुपच्या रामकली ज्युनिअर कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेत बारावीत शिकत होता. सकाळी तो नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आला, साडेनऊ वाजता त्याला काही तरुणांनी बाहेर बोलाविले. बाहेरच येताच कॉलेजच्या आवारातच सहाजणांच्या या टोळीने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला, हाताने तसेच लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केल्यानंतर एका तरुणाने त्याच्या छातीवर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते.
या हल्ल्यात सुशीलकुमार हा गंभीररीत्या जखमी झाला होता. हल्ल्यानंतर सर्व आरोपी तेथून पळून गेले होते. रक्ताच्या थारोळ्यात सुशीलकुमारला पाहिल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने जवळच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले, मात्र रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला होता. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर भांडुप पोलिसांनी पळून गेलेल्या सहाही आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता.
कॉलेजच्या आवारात घडलेल्या या हत्येच्या घटनेने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता, या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेचे आदेश जारी केले होते. त्यानंतर भांडुप पोलिसांच्या तीन वेगवेगळ्या पथकाने आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरु केली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच रात्री उशिरापर्यंत तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या तिघांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. लवकरच इतर आरोपींना अटक करू, असे सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण सोंडे यांनी सांगितले.

एकाच तरुणीवर दोघांचे प्रेम

सुशीलकुमार याचे त्याच कॉलेजमधील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. या तरुणीवर सहापैकी एक आरोपी एकतर्फी प्रेम करीत होता. याबाबत त्याने तिला अनेकदा विचारणाही केली होती, मात्र प्रत्येक वेळेस तिने त्यास नकार दिला होता. याच दरम्यान या आरोपीला तिचे सुशीलकुमारसोबत प्रेमसंबंध सुरु असल्याचे समजले होते. त्यातून त्याने त्याचाच काटा काढायचे ठरविले.

गांजाचे  सेवन

मारहाण करणार्‍या सहा तरुणांनी गांजाचे सेवन केल्याची माहिती मिळली आहे. या महाविद्यालयाच्या परिसरात झोपडपट्टी आहे. त्यात गांजा सर्रास विकला जातो. तेथूनच या तरुणांनी हा गांजा घेतल्याचे सांगितले जाते. पोलीस त्यादृष्टीने तपासही करत आहेत.

१६ ते १७ वयोगटातील आरोप

हे सर्व आरोपी १६ ते १७ वर्षे वयोगटातील आहेत. या कॉलेजच्या परिसरात प्रेमसंबंधांवरून लुटुपूटच्या हाणामार्‍या होत असतात. पण प्रथमच एखाद्याचा जीव जाईल, इतका मोठा हल्ला झाला आहे. हे आरोपी नशेत असल्यामुळेच असे कृत्य करू शकल्याचे सांगितले  जाते.

सुशीलकुमार कोण?

 सुशीलकुमार वर्मा हा भांडुपच्या टेभींपाडा, रामनगरमध्ये रहातो. आई-वडिल आणि एक मोठा भाऊ असा त्याचा परिवार असून त्याचे वडिल रोजदांरीवर काम करतात. तो मनमिळावू आणि समंजस तरुण असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेतील वाद चव्हाट्यावर सुशीलकुमारच्या हत्येची माहिती मिळताच भांडुप पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी गुन्ह्यांतील माहिती काढण्याचे काम करीत असताना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना जाणूनबुजून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती. सकाळी घडलेल्या घटनेची माहिती मिळविण्यासाठी गुन्हे शाखेचे एक विशेष पथक रात्री उशिरापर्यंत भांडुप पोलीस ठाण्यात होते, मात्र त्यांना संशयित आरोपींची माहिती देण्यात येत नव्हती किंवा या हत्येविषयी काहीही माहिती देण्यास वरिष्ठ अधिकारी टाळत असल्याचे दिसून आले.
या आरोपींना आपण अटक करु, तुमचा काहीही संबंध नाही असे एका अधिकार्‍याने तिथे उपस्थित गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना सांगितले. त्यामुळे या अधिकार्‍यांना हात हलवत पुन्हा कार्यालय गाठावे लागले होते. दरम्यान या हत्येच्या घटनेने भांडुप पोलीस आणि गुन्हे शाखेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. यापूर्वीही अशाच अनेक गंभीर गुन्ह्यांत स्थानिक पोलिसांकडून गुन्हे शाखेला जाणूनबुजून डावळण्यात आले होते. एका बड्या आयपीएस अधिकार्‍यांच्या दबावामुळे गुन्हे शाखेला प्रत्येक वेळेस बाजूला ठेवले जात असल्याची खंत गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ अधिकार्‍याने बोलताना सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -