घरमुंबईक्रीडा समिती अभावी विद्यार्थी खेळापासून वंचित

क्रीडा समिती अभावी विद्यार्थी खेळापासून वंचित

Subscribe

विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा झोन 4 ला फटका,युवासेनेच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना दिलासा

विद्यापीठाचा कारभार अधिक सक्षम व्हावा, यासाठी मॅनेजमेंट काऊन्सिलकडून महत्त्वाची भूमिका बजावली जाते. मात्र वर्षभरापासून मॅनेजमेंट काऊन्सिलमध्ये क्रीडा तज्ज्ञच नेमले नसल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. क्रीडा तज्ज्ञांची समितीच नसल्याने विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेतील समस्यांवर तोडगाच निघत नसल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाच्या झोन 4 मध्ये कॉलेजांना मैदानच उपलब्ध न झाल्याने विद्यापीठाकडून घेण्यात येणार्‍या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेला 30 कॉलेजांच्या विद्यार्थ्यांवर मुकण्याची वेळ आली आहे. मात्र ऐनवेळी युवासेनेने पुढाकार घेत झोन 4 च्या कॉलेजांना मैदान उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई विद्यापीठाकडून दरवर्षी आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा भरवण्यात येते. विद्यापीठांशी संलग्न असलेल्या कॉलेजांचे संघ यामध्ये सहभागी होतात. त्यामुळे शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंतच्या खेळाडूंना आपले कौशल्य दाखवून राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होते. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेण्यापूर्वी विद्यापीठाकडून प्रत्येक कॉलेजला कळवण्यात येते. तसेच प्रत्येक झोननुसार कॉलेजांना त्यांच्या भागामध्ये स्पर्धांसाठी मैदान उपलब्ध करून देण्यास सांगण्यात येते. मैदानाचे भाडे विद्यापीठाकडून देण्यात येते. परंतु झोन 4 मध्ये येणार्‍या रायगडमधील विद्यापीठांतर्गत असलेल्या 32 कॉलेजकडून यावर्षी मैदानासंदर्भातील कोणतीही माहिती विद्यापीठाला देण्यात आली नाही. मैदानाच उपलब्ध न झाल्याने यावर्षी झोन 4 मध्ये आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धाच घेण्यात आली नाही.

- Advertisement -

परंतु प्रत्येक झोनमधून दोन संघ अंतिम स्पर्धेसाठी येणे बंधनकारक असल्याने गतवर्षी झोन 4 मधून अंतिम स्पर्धेसाठी निवड झालेल्या एमजीएमसीईटी आणि काळसेकर टेक्निकल कॅम्पस या कॉलेजांना प्राधान्य देण्यात आले. पण त्यामुळे झोनमधील अन्य 30 कॉलेजमधील विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. ही बाब युवासेना सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाचे क्रीडा समन्वयक उत्तम केंद्रे यांच्या निदर्शनास आणली असता त्यांनी क्रिकेट सामन्यांसाठी मैदान उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे सिनेट सदस्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सीईओ सुधीर नाईक यांची भेट घेऊन रायगडमधील आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धांसाठी मुंबईमध्ये मैदान उपलब्ध करून देण्यास सांगितले.

यावर मेट्रोच्या कामामुळे आझाद मैदान व अन्य स्पर्धांमुळे मैदान उपलब्ध होणे अवघड असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु तरीही त्यांनी मुंबईतील काही मैदान स्पर्धेसाठी विद्यापीठाला उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. त्यामुळे झोन 4 मध्ये आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा होऊन तेथील विद्यार्थ्यांनाही आपले कौशल्य दाखवणे शक्य झाले, अशी माहिती युवासेनेचे मॅनेजमेंट काऊन्सिलचे सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.

- Advertisement -

काही तांत्रिक समस्येमुळे क्रीडा तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली नव्हती. समिती नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या 15 ते 20 दिवसांत समिती नेमण्यात येईल. नोव्हेंबरमध्ये बैठक घेऊन झोनमधील कॉलेजांवर मैदानाची जबाबदारी सोपवली होती. परंतु त्यांनी व्यवस्थित काम न केल्यामुळे मैदान उपलब्ध झाले नाहीत.
– उत्तम केंद्रे, क्रीडा समन्वयक, मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाने वर्षभरापासून मॅनेजमेंट काऊन्सिलमध्ये क्रीडा तज्ज्ञांची नियुक्ती केलेली नाही. तज्ज्ञांची नियुक्ती असती तर ही समस्या निर्माण झाली नसती. पुन्हा ही समस्या निर्माण होऊ नये यासाठी क्रीडा तज्ज्ञांची नियुक्ती करावी.
– प्रदीप सावंत, व्यवस्थापन परिषद सदस्य, युवासेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -