घरमुंबईठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सरकारी जीपची बॅटरी चोरीला

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सरकारी जीपची बॅटरी चोरीला

Subscribe

चोरट्यांनी ठाण्यात पार्किंग केलेल्या गाड्यांचे टायर, काचा तोडून मुद्देमाल लांबविण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, चोरट्यांनी सरकारी कार्यालयाच्या आवारात पार्किंग केलेल्या गाड्यांना टार्गेट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पार्किंग गाडीची बॅटरीच चोरट्यांनी लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चोरट्यांच्या तावडीतून बेवारस गाड्याच नाही, पण सरकारी कार्यालयाच्या आवारातील गाड्याही असुरक्षित झाल्याचे चित्र आहे. 21 मे ते 17 सप्टेंबर 2019 या कालावधीत हा प्रकार घडला. दरम्यान, पार्किंग क्षेत्रात तर सीसी कॅमेरेदेखील नसल्याने पोलिसांना आता आरोपीचा शोध घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

ठाणे पश्चिमेकडील कोर्ट नाका परिसरात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयांच्या आवारात सरकारी वाहने पार्क केली जातात. या पार्किंगमध्ये उभी असलेल्या जीपची बॅटरी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची तक्रार जिल्हा सांख्यिकी विभागात काम करणारे वाहनचालक विशाल रायकर (30 रा.बदलापूर ) यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. रायकर हे पूर्वी अलिबाग येथे वाहनचालक म्हणून कार्यरत असताना मे 2019 रोजी त्यांची तात्पुरती नियुक्ती ठाणे जिल्हा सांख्यिकी कार्यालयात केली होती. 21 मे रोजी सायंकाळनंतर पुन्हा ते अलिबाग येथे रुजू झाले. या कालावधीत रायकर चालवीत असलेली सरकारी जीप त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पार्क करून त्याची किल्ली संबंधित विभागाच्या अधिकारी मनीषा माने यांच्याकडे सुपूर्द केली होती.

त्यानंतर 16 सप्टेंबर 2019 रोजी शासनाने पुन्हा त्यांची बदली ठाणे जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीतील जिल्हा सांख्यिकी विभागात वाहनचालक म्हणून केली. दरम्यान,17 सप्टेंबर 2019 रोजी पुन्हा कामावर हजर झाले. तसेच सरकारी जीपची किल्ली घेऊन वाहन सुरू करण्याचा प्रयत्न केला असता गाडी सुरू होईना. तेव्हा जीपमधील बॅटरीच गायब असल्याचे आढळून आले. त्यानुसार रायकर यांनी 3 हजार 300 रुपयांची बॅटरी चोरट्याने लांबवल्याची तक्रार ठाणे नगर पोलीस ठाण्यात केली आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -