घरमुंबईमृतदेहाचे करवतीने ३०० तुकडे केले

मृतदेहाचे करवतीने ३०० तुकडे केले

Subscribe

मृतदेहाचे करवतीने ३०० तुकडे करून पुरावा नष्ट करण्यासाठी अवयव सोसायटीच्या ड्रेनेजमध्ये टाकण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार विरारमध्ये बुधवारी उघडकिस आला. या ड्रेनेजचे सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्यात मानवी हाताची दोन बोटे स्थानिकांना आढळली होती. त्यातील एका बोटात लेडीज अंगठी होती. त्यावरून संबंधित अवयव हा महिलेचा असावा असा अंदाज पोलिसांनी लावला, मात्र अधिक तपासणीत ही बोटे पुरुषाची असल्याचे आढळल्याने पोलीस चक्रावून गेले होते. मात्र, कौशल्याने तपास करत पोलिसांनी घटना उघडकीस आल्यानंतर काही तासांतच आरोपीला अटक केली.
विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीतील बचराज पॅरेडाईजचे सांडपाणी वाहून नेणारी सी विंगमधील ड्रेनेज लाईन तुंबली होती. तसेच त्यातून दुर्गंधीही येत होती.

तसेच त्यातून सांडपाणी आणि मांसाचे तुकडेही बाहेर पडले होते. ही माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ड्रेनेजचे झाकण उघडल्यावर त्यात मानवी अवयवांचे तुकडे आढळले.

- Advertisement -

तसेच सांडपाणी वाहून जाणार्‍या नाल्याची तपासणी केल्यावर त्यात हाताची तीन बोटे सापडली. त्यापैकी एका बोटात लेडीज अंगठी सापडल्याने हा मृतदेह एका महिलेचा असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता.

या खूनाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि सर्व फ्लॅटचा शोध घेतला. त्यावेळी सी विंग फ्लॅट क्र. 602 मधून कुबट वास येत होता. या फ्लॅटमध्ये भाडेकरू म्हणून पिंटु जयकिशन शर्मा (28) नुकताच रहायला आला होता. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी त्याला त्याच्यावरचा संशय बळावून त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

- Advertisement -

दारु, पैसे, लग्न आणि हत्या
सांताक्रुझ वाकोला मुंबई येथे राहणारा पिंटु (28) शेअर बाजारात इन्वेस्टर होता. सहा महिन्यापूर्वी त्याची मिरा रोडच्या नयानगर येथील गणेश कोल्हटकर (58) यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून त्याने गणेश यांच्याकडून एक लाख रुपये उसने घेतले होते. त्यापैकी 40 हजार परतही केले होते. त्यानंतर पिंटुने विरारला फ्लॅट भाड्याने घेतला. या फ्लॅटमध्ये शिफ्टींग करण्यासाठी त्याने गणेशची मदत घेतली. 16 जानेवारीला रात्री ते याच फ्लॅटमध्ये दारु प्यायला बसले. दारु प्यायल्यानंतर उर्वरीत पैशांची मागणी गणेशने केली. आपण लग्न करीत असल्याचे पैशांची गरज असल्याचे गणेशने त्याला सांगितले. त्यातून वादावादी होवून रागाने गणेशने तेथून निघण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पिंटुने त्याला धक्का दिला. त्यात गणेश उपडा पडला, त्याच्या नाकातून रक्तस्त्राव होऊन तो खाली कोसळला.

त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे घाबरून जावून हा गुन्हा लपवण्यासाठी गणेशने प्लान केला. घरातील करवतीने त्याने गणेशच्या मृतदेहाचा गळा कापला. त्याने कान, हाताची बोटे कापून कापलेले अवयव संडासात टाकून फ्लश केले. त्यानंतर तो सांताक्रुझला निघून गेला. दुसर्‍या दिवशी पुन्हा विरारला येऊन त्याने गणेशच्या मृतदेहाचे उरलेले अवयव, तुकडे, बरगड्यांचे तुकडे करून ते पिशवीत घालून वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकून दिले.

तुंबलेल्या गटाराने गुन्हा केला उघड
सतत चार दिवस तो या मृतदेहाचे बारीक-बारीक तुकडे करून ते संडास आणि बाथरुममध्ये टाकत राहिला. तसेच संधी मिळाल्यावर मृतदेहाचे तुकडे इतरत्र टाकत राहिला. ड्रेनेजमार्फत हे अवयव वाहून जातील किंवा विरघळून जातील. अशी त्याची समजुत होती. ती तुंबलेल्या गटारामुळे फोल ठरली, अशी कबुली पिंटुने पोलिसांना दिली. दरम्यान गणेश बेपत्ता असल्याची तक्रार नयानगर पोलीस ठाण्यात 15 तारखेला नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पिंटुने दिलेली कबुली आणि गुन्ह्याची तपास करण्यासाठी सीसीटिव्ही फुटेज आणि इतर माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात येत आहे. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतही काही मानवी हाडे मिळाल्यामुळे 365,363,34 अन्वये यापूर्वीच गुन्हा दाखल झाला होता. आता विरार पोलीस ठाण्यात 302,201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -