घरमुंबईमुंबईतील विजेची मागणी १५० मेगावॉटने वाढणार

मुंबईतील विजेची मागणी १५० मेगावॉटने वाढणार

Subscribe

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गरज

मुंबईतील वाढते पायाभूत सुविधा प्रकल्प पाहता मुंबईची विजेची मागणी ही येत्या दीड ते दोन वर्षात आणखी १५० मेगावॉटने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत येणारे वाहतुकीचे तसेच रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रकल्प पाहता विजेची मागणी आणखी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यासोबतच मुंबई बाहेरून वीज वाहून आणण्याची गरजही बोलून दाखवण्यात येत आहे. मुंबईत वीज आणणार्‍या पारेषण वाहिन्यांचे विजेचे जाळे सक्षम झाल्यास ही विजेची वाढती गरज भरून काढता येईल असे वीज ग्राहक संघटनांचे मत आहे.

मुंबईतील सरासरी विजेची मागणी ही सरासरी ३००० मेगावॉट ते ३२०० मेगावॉट इतकी असते. पण उकाड्यातील कमाल वीज मागणीच्या काळात या विजेच्या मागणीने ३६०० मेगावॉटचा आकडा पार केला आहे. मुंबईत बाहेरून वीज आणण्याची मर्यादा ओलांडली आहे. म्हणूनच हे विजेचे जाळे सक्षम करतानाच आणखी क्षमतावाढ होण्याची गरज असल्याचे वीज क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. मुंबई शहराअंतर्गत आणखी विजेची निर्मिती करणे शक्य नसल्यानेच मुंबईतील वाढत्या विजेच्या मागणीसाठी बाहेरून वीज आणण्याची गरज व्यक्त होत आहे. मुंबईत मेट्रो वाहिन्यांचे वाढते जाळे पाहता भूमीगत तसेच उन्नत मेट्रो वाहिन्यांच्या प्रकल्पासाठी अधिक विजेची गरज भासणार आहे.साधारणपणे १५० मेगावॉटने ही विजेची मागणी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

टाटा पॉवर, बेस्ट आणि अदानी, महावितरण यासारख्या कंपन्यांच्या माध्यमातून रिअल इस्टेट तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये मेट्रोसारख्या प्रकल्पांची विजेची गरज भागवण्यात येणार आहे. त्यासाठी वीज कंपन्यांसोबत मेट्रो ३, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने करार करण्याची तयारी केली आहे. पण याआधी बेस्टसारख्या उपक्रमाला काही प्रकल्प रखडल्याचा फटकाही सहन करावा लागला आहे. त्यामध्ये वडाळा ट्रक टर्मिनलचे रखडलेले काम, धारावी पुनर्विकासाचे काम यासारख्या रखडलेल्या प्रकल्पांमुळे प्रत्यक्षात विजेची मागणी वाढली नाही, असेही निदर्शनास आले आहे. वडाळा ट्रक टर्मिनल आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पातून १० मेगावॉट ते १५ मेगावॉट विजेची मागणी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण प्रत्यक्षात दोन्ही प्रकल्प न आल्याने नव्या प्रकल्पाचा अंदाज चुकीचा ठरला आहे.

विक्रोळी सबस्टेशन ऑन ट्रॅक
विक्रोळी सबस्टेशनमुळे मुंबईत बाहेरून वीज वाहून आणण्याची क्षमतावाढ होणार आहे. पण या ४०० केव्हीच्या स्टेशनच्या उभारणीत दिरंगाई झाल्याने राज्य वीज नियामक आयोगाने या प्रकल्पाचे काम बंद करण्याचे आदेश टाटा पॉवरला दिले होते. टाटा पॉवरने आता राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेश शिथिल करण्याची विनंती करत, विक्रोळी सबस्टेशनचे काम पुन्हा सुरू करण्यासाठीची याचिका आयोगाकडे केली आहे. खारघर – विक्रोळी, तळेगाव – कळवा या दोन वाहिन्यांच्या माध्यमातून अतिरिक्त वीज आणणे यामुळे शक्य होईल.

- Advertisement -

सोलारची चलती
मोनोरेल प्रकल्पाने सर्व स्टेशनवर सोलार पॅनेल बसवण्यासाठीची तयारी केली आहे. तर मेट्रो १ या प्रकल्पाअंतर्गत याआधीच अनेक स्टेशनवर सौरऊर्जेचा वापर सुरू झालेला आहे. मेट्रोच्या आगामी सर्व मार्गावर सौरऊर्जेचा वापर हा स्टेशनअंतर्गत विजेची मागणी भागविण्यासाठी होणार आहे. त्यामुळे गो ग्रीनच्या संकल्पनेला सौरऊर्जेच्या माध्यमातून आता वीज क्षेत्रातूनही पसंती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -