घरमुंबईकोरोनाचा अंदाज घेऊन परीक्षा वेळापत्रक नव्याने जाहीर होणार

कोरोनाचा अंदाज घेऊन परीक्षा वेळापत्रक नव्याने जाहीर होणार

Subscribe

विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटीसेलकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात येईल.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज जाहीर केले.

राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी सोमवारी सकाळी 11 वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटीसेलकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात येईल. या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठांचे कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल तयार करून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि मंत्री यांना सादर करतील त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही सामंत यांनी संगितले.

- Advertisement -

त्याचप्रमाणे राज्यातील सर्व खाजगी विद्यापीठांची व्हिडीओ कॉन्फरन्सही लवकरच घेण्यात येईल असेही सामंत यांनी यावेळी संगितले. या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उच्च तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राज्यातील 13 विद्यापीठांचे कुलगुरू, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने,सीईटी सेल चे आयुक्त संदीप कदम, मुंबईतील जे. जे. स्कुल ऑफ आर्टचे संचालक राजीव मिश्रा सहभागी होते.

विद्यापीठात कोरोनावर मल्टीपर्पज लॅब

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठांमध्ये विविध प्रकारच्या आजारा संदर्भातील चाचण्या घेता येतील अशा स्वरूपाच्या मल्टिपर्पज लॅब विद्यापीठांमध्ये सुरू करण्याच्या सूचनाही सामंत यांनी दिल्या. नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अशा प्रकारची लॅब सुरू केली आहे. यासाठी केंद्र, राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात येथील याच पार्श्वभूमीवर राज्यातील इतर विद्यापीठांनी लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सामंत म्हणाले

- Advertisement -

एनएसएस विद्यार्थ्यांचीही घेणार मदत

आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनएसएस विद्यार्थ्यांचीही मदत घेता येईल का याचा सर्व विद्यापीठाने विचार करावा. सोलापूर विद्यापीठाने आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एक प्रयोग सुरू केला आहे. एनएसएसच्या 27 विद्यार्थ्यांना आईवडिलांकडून परवानगी घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन आरोग्यसेवेच्या यंत्रणेसाठी सज्ज केले. याच धर्तीवर राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये सुद्धा एनएसएसचे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेच्या सेवेसाठी घेता येतील का यासाठीचा अहवाल सादर करावा अशा सूचनाही सामंत यांनी कुलगुरूंना केल्या.


कोरोनामुळे उद्भवलेल्या मानसिक समस्यांच्या निराकरणासाठी विद्यापीठाचा पुढाकार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -