घरमुंबईपूल उद्घाटनाच्या दुसर्‍याच दिवशी पहिला बळी

पूल उद्घाटनाच्या दुसर्‍याच दिवशी पहिला बळी

Subscribe

ठाणे शहरात मीनाताई ठाकरे चौक आणि संत नामदेव चौक येथे 2 उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. दिलेल्या मुदतीपेक्षा दोन वर्षांहून अधिक काळ हे कामकाज सुरू असूनही आजही ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे काम पूर्ण न झालेल्या स्थितीत असलेल्या या पुलाचे उद्घाटन शिवसेना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 3 मार्च रोजी झाले. मात्र, अर्धवट स्थितीत असलेल्या कॅसेल मील येथील पुलाने दुसर्‍याच दिवशी म्हणजे 4 मार्च रोजी पहिला बळी घेतला आहे.

या पुलावरून जात असताना एका 22 वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला. जितेंद्र अशोक धोत्रे असे या युवकाचे नाव असून, तो हरिनिवास सर्कल, नौपाडा येथे राहणारा आहे. तो खाजगी क्षेत्रात साफसफाईचे काम करीत होता. दुपारच्या सुमारास काम आटोपून घरी जात असताना हा अपघात घडला आहे. या युवकाने हेल्मेट घातले असतानाही त्याच्या डोक्याला पुलाच्या कठड्याला असलेल्या लोखंडी खांबांचा फटका बसला. त्यामुळे हेल्मेटचेही तुकडे झाले आहेत. डोक्याला जबर मार बसल्याने त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्याला स्थानिकांनी तातडीने सिव्हील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा वनवे असलेला उड्डाणपूल आहे. मात्र, यावर एकही गतीरोधक नाही किंवा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणतीच व्यवस्था नाही. सेफ्टी विन्डोज न लावल्याने त्या अँगलचा मार लागून युवकाचा मृत्यू झाला.

- Advertisement -

लवकरच होणार्‍या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी उद्घाटनाची घाई करण्यात आली. मात्र, यावर असलेल्या लोखंडी खांबांचे स्क्रूदेखील व्यवस्थित बसवण्यात आलेले नाहीत किंवा त्याची फिनीशिंगदेखील झालेली नाही. या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अशा अवस्थेत उद्घाटन करून सत्ताधार्‍यांना आम्ही काम केले असल्याचे दाखवायचे आहे. त्यामुळे अपूर्ण असलेल्या उड्डाणपुलाचे घाईत उद्घाटन केले. त्यामुळेच हा अपघात घडला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

ठाणे शहरातील वाढणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीए आणि ठामपाच्या माध्यमातून शहरात तीन उड्डाणपुलांचे काम हाती घेण्यात आले. स्व. मीनाताई ठाकरे चौक उड्डाणपूल हा दोन मार्गिकेचा असून, गोकुळनगर ते एलबीएस मार्गापर्यंत जातो. ही मार्गिका 8.5 मीटर रुंद असून, लांबी 683 मीटर आहे. दुसरी मार्गिका मीनाताई ठाकरे चौक ते जेल तलावाकडे जाणारी असून, ती 7 मीटर रुंद आणि 639 मीटर लांब आहे, तर संत नामदेव चौक उड्डाणपूल जुन्या टेलिफोन एक्स्चेंजकडून कावेरी हॉस्पिटल ते नौपाड्यातील महात्मा गांधी मार्गापर्यंत जातो. याची रुंदी 8.5 मीटर रुंद आणि लांबी 647 मीटर रुंद आहे. या उड्डाणपुलांमुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याचे मत पालिका प्रशासनाने व्यक्त केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -