घरमुंबईमुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार,सवांद तुटला

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार,सवांद तुटला

Subscribe

६०० इंटरकॉम आठ महिन्यांपासून बंद

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका आता विद्यार्थ्यांनंतर थेट कर्मचार्‍यांनादेखील बसण्यास सुरुवात झाली आहे. कलिना कॅम्पस येथील इंटरकॉम सेवा गेल्या आठ महिन्यांपासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे विद्यापीठातील जवळपास सर्वच अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे अनेक प्रशासकीय कामे रखडली आहेत. कर्मचारीच नव्हे तर आपल्या प्रश्नांसाठी विद्यापीठात फोन करणार्‍या विद्यार्थ्यांनाही दाद मिळत नाही. त्यांच्या फोनला उत्तर द्यायला कुणी उपलब्ध नाही. या ढिसाळ कारभारामुळे कॅम्पसमधील सुमारे ६०० इंटरकॉम गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह विद्यापीठाचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. विद्यापीठातील ज्या केंद्रातून ही सेवा पुरविली जाते, त्याठिकाणी वातानुकूलित यंत्रणा नसल्याने हा सगळा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससह फोर्ट कॅम्पसध्ये अधिकार्‍यांचा एकमेकांशी संवाद सुरळीतपणे व्हावा. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत आणि मुंबई आणि कोकणात शिक्षणाचे धडे घेणार्‍या विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संपर्क साधता यावा यासाठी कलिना कॅम्पस येथे एमटीएनएलच्या मदतीने इंटरकॉम सुविधा बसविण्यात आली आहे. यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील जीवशास्त्र विभागात एक जागा देण्यात आली असून या ठिकाणी विद्यापीठातील सर्व इंटरकॉम सेवा आणि दूरध्वनी सेवा चालविली जाते.

- Advertisement -

पण गेल्या आठ महिन्यांपासून विद्यापीठाअंतर्गत असलेली इंटरकॉम सेवा बंद पडली आहे. यामुळे तब्बल ६०० फोन बंद अवस्थेत पडून असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे विद्यापीठाचे प्रचंड नुकसान तर झालेच; पण यामुळे कार्यालयीन कामालाही प्रचंड फटका बसत असल्याची माहिती विद्यापीठातील अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य प्रदीप सावंत, सिनेट सदस्य महादेव जगताप, शशिकांत झोरे, शीतल शेठ-देवरुखकर यांनी विद्यापीठाच्या इमारती व वेगवेगळ्या विभागात बंद असलेल्या इंटरकॉम सेवेबद्दल त्या विभागात शुक्रवारी पाहणी केली. त्यावेळी वरील माहिती समोर आली आहे.

मशीन्स भंगारात पडून

कलिना कॅम्पस येथील आठ महिन्यांपासून बंद असलेली इंटरकॉम सेवा सुरळीत करण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांची गरज असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी आवश्यक असलेली ईपीबीएक्सची मशीन्स आणि कार्ड रॅक हे बंद असल्याने त्या भंगारात पडून आहेत. त्यामुळे ही सेवा पूर्णपणे ठप्प असल्याची बाब युवा सेनेच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. वातानुकूलित यंत्रणा नसल्याने या यंत्राना फटका बसला आहे. पण याच बाजूला असलेल्या एमटीएनलच्या कार्यालयात मात्र वातानुकूलित यंत्रणा सुरु आहे. त्या ठिकाणाहून कलिना परिसरातील इतर भागांत इंटरनेट आणि इतर सुविधा पुरविली जात असल्याची माहिती ‘आपलं महानगर’च्या हाती आली आहे.

- Advertisement -

प्रस्ताव पाठवूनही मंजुरी नाही

एकीकडे आठ महिन्यांपासून येथील इंटरनेट सेवा बंद असल्याने प्रशासनाला फटका बसत आहे. त्यानंतरही प्रशासनाने त्यातून धडा घेतलेला नाही. यासाठी आवश्यक असलेल्या नव्या यंत्रसामुग्रीसाठी त्या विभागाने अनेकवेळा खरेदी विभागाकडे प्रस्ताव पाठविलेले आहेत. मात्र आजतागायत ते मंजूर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आज ही सेवा ठप्प असल्याची माहिती समोर आली आहे.

एमटीएनएलशी करारही संपला

मुंबई विद्यापीठाने कलिना कॅम्पस येथील जीवशास्त्र विभागात एक जागा भाडेत्तत्वावर दिली आहे. या ठिकाणी कलिना परिसरात इंटरनेट सुविधा पुरविली जाते. अत्यंत सुसज्ज अशी यंत्रणा या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. परंतु या जागेचा करार गेल्या वर्षांपासून संपलेला आहे. त्यानंतरही विद्यापीठ प्रशासनाने या जागेसाठीचे भाडे वसुलीदेखील केलेली नसल्याची माहिती यानिमित्ताने समोर आलेली आहे.

मॅनेजमेंट कौन्सिलकडे जाब विचारणार

गेल्या आठ महिन्यांपासून ही यंत्रणा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अधिकार्‍यांशी संपर्क होत नव्हता. आठ महिन्यांपासून ही यंत्रणा बंद असताना प्रशासनाला त्यात बदल करावासा वाटत नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. विशेष म्हणजे, अनेकवेळा प्रस्ताव पाठवूनही जर प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असेल तर त्यावरुनच विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत किती गंभीर आहे, हे समोर येते. त्यामुळे आगामी मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत या मुद्यावर आम्ही प्रशासनाकडे दाद मागणार आहोत.
– प्रदीप सावंत, मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य, मुंबई विद्यापीठ.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -