घरमुंबईहत्येचा कट रचणारे चोरीच्या प्रकरणाने अडकले

हत्येचा कट रचणारे चोरीच्या प्रकरणाने अडकले

Subscribe

व्यावसायिक कारणातून प्रतिस्पर्धी बिल्डरच्या हत्येचा कट

बांधकाम व्यवसायात आपला प्रतिस्पर्धी अव्वल ठरतोय हे पचनी न पडल्याने एका बिल्डर मामाभाच्याने त्याला संपवण्याचा डाव आखला त्यासाठी भाडोत्री गुंडांना सुपारीही दिली. मात्र या भाडोत्री गुंडांनी आखलेल्या चोरीमुळे ते अलगद पोलिसांच्या ताब्यात आले आणि नियोजित हत्येचा कट उधळला. नागपाडा पोलिसांनी चोरी आणि हत्येचा कट अशा दोन प्रकरणात सहभाग असणार्‍या दोन बिल्डरांसह ६ जणांना अटक केली आहे.

एखाद्या क्षेत्रात अव्वल बनण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असते त्यासाठी वाट्टेल ते करायला माणूस तयार असतो. पेशाने बिल्डर म्हणून काम करणारे चंद्रकांत म्हात्रे आणि भाचा समीर चौधरी हे दोघेही नवी मुंबईमध्ये राहतात. मात्र बांधकाम क्षेत्रात प्रतिस्पर्धी बिल्डरला जास्त कामे मिळत असल्याने या दोघांनी मिळून त्याला संपवण्याचा कट रचला. पण ते स्वत: हे काम करु शकणार नसल्याने चंद्रकांत म्हात्रे याचा भाचा समीर चौधरी याने त्याचा मित्र जीवन बांदणे याला या कटात सहभागी करुन घेतले. जीनव बांदणे याने या दोघांच्या म्हणण्यानुसार तीन भाडोत्री गुंडांना त्या बिल्डरला संपवण्यासाठी दोन लाखांची सुपारी दिली होती. हत्येसाठी चंद्रकांत म्हात्रे याने त्याच्याकडे असणारा बेकायदेशीर कट्टा या भाडोत्री गुंडांना देवू केला होता. आरोपी राहुल रघुनाथ सावंत (३० वर्षे), संतोष सिताराम वाघमारे (३५ वर्षे), अभिजीत शंकर उंडे (२५ वर्षे) या तिघांनीही बिल्डरला संपवण्यासाठी दोन लाखाची सुपारी घेतली.

- Advertisement -

त्यासाठी त्यांनी ५० हजार रुपये अ‍ॅडव्हान्स म्हणून घेतले. हत्येसाठी वापरण्यात येणारे हत्यार समोरुन आयते मिळाल्याने त्या हत्याराचा धाक दाखवून दरोडा घालायचा आणि अधिक पैसे मिळवायचे जेणेकरुन चोरी आणि सुपारीचे दोन लाख अशी जास्तीत जास्त रक्कम ताब्यात येईल, असा त्यांनी डाव रचला. चोरीसाठी मुंबई सेंट्रल या ठिकाणी असणार्‍या सिटी मॉल मधल्या एका व्यापार्‍याला लुटण्याचे त्यांनी ठरवले होते. ठरल्याप्रमाणे सुपारी घेतलेले तिन्ही भाडोत्री गुंड मुंबई सेंट्रलच्या बी.आय.टी चाळीजवळ येवून एका व्यापार्‍याला लुटणार होते. ही माहिती नागपाडा पोलिसांनी गुप्त बातमीदारातर्फे मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. चोरीच्या उद्देशाने आलेल्या या तिघांकडेही कट्टा असल्याने पोलिसांनी त्यांची कसुन चौकशी सुरु केली या दरम्यान आरोपी जीवन बांदणे याच्याकडून त्यांना कट्टा मिळाला असल्याची कबुली त्यांनी देताच पोलिसांनी जीवन आंदणे यालासुद्धा ताब्यात घेतले.

या घटनेतील आरोपी फक्त चोरीच्या उद्देशाने आले नसून हत्या करण्यासाठी त्यांना हे हत्यार देण्यात आले असल्याचे उघड होताच जीवन बांदणे याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या हत्येचे मास्टरमाईंड चंद्रकांत म्हात्रे आणि समीर चौधरी या मामाभाच्यांना अटक केली. आरोपी संतोष वाघमारे (३५) हा छोटा शकील गँगचा हस्तक असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती नागापाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बागवे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -