घरमुंबईशाळेसाठी विद्यार्थ्यांची ४ किलोमीटरची पायपीट

शाळेसाठी विद्यार्थ्यांची ४ किलोमीटरची पायपीट

Subscribe

मराठी माध्यमांच्या शाळांना राज्यात घरघर लागली असताना नवी मुंबई महापालिका शाळांच्या पटसंख्येत मात्र वाढ होताना दिसत आहे. गेल्या वर्षीपेक्षा चालू वर्षात पटसंख्येत एक हजारने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेच्या शाळांकडून देण्यात येणारे गुणात्मक शिक्षण आणि इतर उपक्रमांमुळे महापालिकेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र आजही तुर्भे एमआयडीसी परिसरातील बोनसरी गाव व आजूबाजूच्या वस्त्यांमधील मुलांना शिक्षणासाठी सुमारे ४ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. मराठी माध्यमांसोबत हिंदी भाषिकांसाठीही शाळा चालवल्या जात आहेत. महापालिकेने विद्यार्थ्यांसाठी आलिशान व भव्य शाळा इमारती उभारल्या आहेत. अद्ययावत वर्ग, बसायला बाके, फळे, दर्जेदार प्रयोगशाळा, सर्व पुस्तकांनी समृद्ध असे ग्रंथालय, अशा विविध सुविधा दिल्या आहेत. पण एवढे असूनही बोनसरी व आजूबाजूच्या झोपडपट्टी वस्तीतील मुलांना पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी तुर्भे गावातील डॉ सामंत विद्यालय गाठावे लागते. तर अंगणवाडी उघड्यावर भरत आहे.आर्थिक परिस्थिती कमजोर असणार्‍या पालकांना तुर्भे येथे मुलांना शाळेत पाठवण्याचा प्रवासखर्च झेपत नाही.

- Advertisement -

त्यात एमआयडीसी पट्टा असल्याने अवजड वाहनांची वर्दळ मोठ्याप्रमाणात असल्याने अपघात होत असतात. त्यात शाळेचे अंतर अधिक असल्याने शाळेत न जाता मुले बालमजूर म्हणून काम करू लागलेत. तर काही मुले लहान वयातच व्यसनाच्या आहारी गेली आहेत.त्यामुळे बोनसरी गावात मनपाने पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू करावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नालंदा बुद्ध विहार संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी पालिका शिक्षण मंडळाकडे केली आहे. त्यानुसार गायकवाड यांनी गुरुवारी शिक्षण अधिकारी संदीप संगवे यांची भेट घेऊन त्यांना ही माहिती दिली. तसेच येत्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याची मागणी केली. यावेळी शिक्षण अधिकारी संगवे यांनी आपण याबाबत प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -