घरमुंबईराष्ट्रवादीची आता विधानसभेची तयारी

राष्ट्रवादीची आता विधानसभेची तयारी

Subscribe

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता निवडणूक निकालाचे चित्र काय असेल याबाबत राजकीय पक्षांकडून आडाखे बांधायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचा प्रचाराचा धुरळा जमिनीवर बसला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. राज्यात सध्या भीषण दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. सरकार दुष्काळ निवारणाची तयारी करत असले तरी त्यातून ग्रामीण भागातील पाणी-चारा असे मुलभूत प्रश्न सुटताना दिसत नाहीत. याच परिस्थितीत थेट जनतेमध्ये जाऊन काम करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रणनीती आखली आहे. यासाठी पक्षाचे सर्व आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत दुष्काळ निवारण्याच्या कामासोबतच विधानसभा मतदारसंघात जनतेसोबत सुसंवाद साधण्याची संधी राष्ट्रवादी साधत आहे.

लोकसभा निवडणुकीत महाआघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष बघायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या प्रत्येक सभेत शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. भाजपने पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे विजयसिंह मोहिते पाटील यांना भाजपात घेत राष्ट्रवादी खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी बारामती मतदारसंघात तर पंतप्रधान मोदींनी माढा मतदारसंघात सभा घेत पवारांच्या गडाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. आता या सर्व आरोप- प्रत्यारोपांनंतर राज्यातील एकूणच राजकीय स्थिती काय असेल याचे उत्तर २३ मे रोजी निकालाच्या दिवशी मिळेल. एकूणच राज्यातील सर्व मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी पवारांनी शनिवारी (दि.४) मुंबईत महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीला लोकसभेचे सर्व उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याकडून निवडणुकीत विधानसभानिहाय झालेले मतदानाचा अहवालही सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

यंदाच्या निवडणुकीत मनसेनेही मोदी, शहा यांच्या विरोधात प्रचारसभा घेतल्याने याचा फायदा महाआघाडीला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास मनसेला आगामी विधानसभा निवडणुकीत महाआघाडीत सामावून घेण्याबाबतही या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते, याबाबत पवार पदाधिकार्‍यांची मतेही जाणून घेणार आहेत. त्यातच आता राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी दुष्काळी परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून निवडणुका संपल्यानंतर शरद पवार दुष्काळ दौरा करणार असल्याचे पक्षाच्यावतीने जाहीर करण्यात आले. याची सुरुवात त्यांनी उस्मानाबादहून केली. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनीही निवडणूक आयोगाला पत्र लिहित दुष्काळामुळे आचारसंहिता शिथील करण्याची विनंती केली आहे. मंत्रिमंडळाची बैठक बोलावून सर्व मंत्र्यांना दुष्काळी दौरे करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षांकडून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राजकीय दौरे सुरू होतील. राष्ट्रवादीच्या बैठकीत दुष्काळाच्या मुद्यावर चर्चा करण्यात येणार आहे. विधानसभेची मुदत ऑक्टोबर २०१९ मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे यंदा सप्टेंबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी होणार्‍या या बैठकीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

नाशिकचाही आढावा घेणार

नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शरद पवारांनी नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रचारादरम्यान दिवसाआड नाशिकमध्ये येऊन पवारांनी सभा घेतल्या. तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेत कानमंत्रही दिला. त्यामुळे एकूणच नाशिक मतदारसंघात काय स्थिती असेल याचाही आढावा पवार यावेळी घेणार असून त्यादृष्टीने जिल्हाध्यक्षांकडून विधानसभानिहाय अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीची मोर्चबांधणी

विधानसभेतील काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मंजूर केला आहे. निवडणुकी दरम्यान झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणात अनेक उलथापालथ झाली त्यामुळे विरोधीपक्षनेतेपद निवडीत राष्ट्रवादीची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रवादीने या पदाबाबत दावा सांगितल्यास पक्षाकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सातार्‍याचे आमदार शशिकांत शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसकडून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याही नावाची चर्चा आहे. विखे आणि थोरात हे दोघेही नेते नगर जिल्हयातील आहे; परंतु या दोघांमधून विस्तवही जात नाही. लोकसभा निवडणुकीत या दोघांमधेही अटीतटीचा संघर्ष बघायला मिळाला. निवडणुकीदरम्यान संगमनेर येथे आलेल्या पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी थोरात यांच्याशी चर्चा करत राजकीय स्थितीचा आढावा घेतला होता. विखेंना शह देण्यासाठी काँग्रेसकडून थोरातांचे नाव या पदाकरता पुढे येऊ शकते. या एकूणच परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -