घरमुंबईभिवंडीतील पिळंझे पुल पुन्हा कोसळला; आदिवासी वस्त्यांचा रस्ता बंद

भिवंडीतील पिळंझे पुल पुन्हा कोसळला; आदिवासी वस्त्यांचा रस्ता बंद

Subscribe

भिवंडी परिसरात गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसात अनगांव लगतच्या पिळंझे ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषदच्या बांधकाम खात्याने बांधलेला पुल पुन्हा एकदा कोसळल्याने पाच ते सहा गांवपाड्यांवरील नागरिकांचा रस्ता बंद झाला आहे.

भिवंडी परिसरात गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसात अनगांव लगतच्या पिळंझे ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषदच्या बांधकाम खात्याने बांधलेला पुल पुन्हा एकदा कोसळल्याने पाच ते सहा गांवपाड्यांवरील नागरिकांचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, चाकरमान्यांचे हाल सुरु झाले आहेत. विशेष म्हणजे हाच पुल मागील पावसाळ्यात देखील कोसळला होता. या पुलाची डागडुजी मार्च, एप्रिल २०१९ मध्ये करण्यात आली होती. तो पुन्हा कोसळल्याने आदिवासी गांवपाड्यांवरील नागरीकांच्या जीवाशी शासकीय यंत्रणा खेळ करत असल्याचे समोर आले आहे.

पिळंझे ग्रामपंचायत हद्दीतील भवरपाडा, बेंदरपाडा, नंबरपाडा, वारणा पाडा, अडगापाडा या आदिवासी पाड्यांवर जाण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत एमएमआरडीएच्या माध्यमातून ८० लाख रुपये खर्च करून २०१८ मध्ये रस्ता व येथील नाल्यांवर पुल तसेच पाईप, मोऱ्या बनवण्यात आल्या आहेत. परंतु येथील रस्त्यावरील पूल व सहा ठिकाणच्या मोऱ्या मागील तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसात वाहून गेल्या आहेत. या रस्त्यावरील पाईप टाकलेल्या मोऱ्या या सहा ठिकाणी वाहून गेल्याने येथील आदिवासी गांवपाड्यावरील शेकडो नागरिकांचे हाल होत आहेत. येथील रस्त्यावरील पूल व रस्ता दोन ठिकाणी खचल्याने या आदिवासी पाड्यातील नोकरदार, चाकरमानी, बाजार हाट करणारे व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तसेच रुग्णांना उपचारासाठी तसेच पाड्यावरील रोजगारासाठी अनगाव, भिवंडीकडे जाण्यासाठी सुमारे ४ किमी. दूर जावे जावे लागत आहे. मात्र या तुटलेल्या पुल व मोऱ्यांमुळे आदिवासी तसेच स्थानिक नागरिकांना अडथळा निर्माण झाला आहे. या घटनेची खबर पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासन तसेच लोकप्रतिनधींना देखील नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरील हाच पुल कोसळून येथील रस्ता मागील पावसाळ्यात खचला होता. या पुलाची डागडुजी मार्च, एप्रिल २०१९ मध्ये करण्यात आली होती. मात्र त्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात हाच पूल व रस्त्यावरील मोऱ्या कोसळून या रस्त्यावरील दोन पाईप असलेल्या मोऱ्या वाहून गेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष व ठेकेदाराचा भ्रष्ट कारभार उघड झाल्याने येथील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -