घरमुंबईबनावट कागदपत्रांनी बँकेलाच २ कोटींचा गंडा!

बनावट कागदपत्रांनी बँकेलाच २ कोटींचा गंडा!

Subscribe

बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांनाच २ कोटींचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.

बोगस दस्तावेज सादर करुन लोन घेऊन बँकांची फसवणूक करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. सुशांत प्रकाश आयरे आणि चेतन वालजीभाई कावा अशी या दोघांची नावे असून ते दोघेही लोन एजंट म्हणून कार्यरत आहेत. या टोळीने आतापर्यंत अनेक बँकांना दोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले असून या गुन्ह्यांतील फरार आरोपींचा आता पोलीस शोध घेत आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बोगस दस्तावेज सादर करुन बँकेतून लोन घेऊन या लोनची परतफेड न करता विविध बँका तसेच वित्तीय संस्थांची फसवणूक करणारी एक टोळी मुंबई शहरात कार्यरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी ही अटक केली आहे.

कर्ज न फेडता काढला पळ

एका खासगी वित्तसंस्थेने पोलिसांत तक्रार करुन दोन एजंटांनी त्यांच्या कंपनीतून चार लाख रुपयांचे लोन घेतले. मात्र लोनची परतफेड न करता ते पळून गेले आहेत, तसेच त्यांनी सादर केलेले सर्व दस्तावेज बोगस असल्याचे सांगितले होते. या माहितीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल बाजारे आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी याच गुन्ह्यांत चेतन कावा आणि सुशांत आयरे या दोघांना पोलिसांनी अटक केली.

- Advertisement -

हेही वाचा – वाहन कर्जाच्या नावाने ६२ लाखांची फसवणूक

कर्जासाठी उघडली बोगस खाती

पोलीस तपासात त्यांनी इतर सहकार्‍यांच्या मदतीने बोगस पॅनकार्ड, आधारकार्ड, पगार पावत्या बनवून त्याद्वारे बँकेतून पर्सनल तसेच होमलोन घेतल्याचे उघडकीस आले. त्यांनी अशाच प्रकारे विविध बँकेत बोगस खाती उघडली होती. आतापर्यंत त्यांनी बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, आयडीबीआय, टाटा कॅपिटल, एडेलवीज, आदित्य बिर्ला कॅपिटल, एचडीएफसी, इन्क्रेड फायनान्शिअल सर्व्हिस, फुलर्टन, इंडिया बुल्स आदी बँकेसह वित्तीय संस्थाची फसवणूक केली आहे. या टोळीने आतापर्यंत १७ लोन मंजूर करवून घेऊन दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तपासात त्यांनी कांजूरमार्ग, विरार, भाइंदर, मिरारोड या ठिकाणी भाड्याने रुम घेऊन तिथे बोगस दस्तावेज तयार केल्याची कबुली दिली आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आली असून त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -