घरमुंबईवसई परिवहन बसच्या धडकेत दोन म्हशींचा मृत्यू

वसई परिवहन बसच्या धडकेत दोन म्हशींचा मृत्यू

Subscribe

भगिरथी कॉर्पोरेशनची अनागोंदी

प्रतिनिधी:-वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसने गुरुवारी पापडी येथील रस्त्यावर चार म्हशींना धडक दिली. या अपघातात दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून दोन म्हशींवर उपचार सुरू आहेत.वसई-विरार पालिकेची परिवहन सेवा सुरु झाल्यापासून वादग्रस्त ठरु लागली आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर भगिरथी ट्रान्स कॉर्पोरेशन कंपनीला ही सेवा चालवण्यासाठी देण्यात आली आहे.

ही सेवा देण्यासाठी या कंपनीने भंगारातल्या बसेसचा वापर केला. नफ्यासाठी एसटीचे महत्त्वाचे मार्ग ताब्यात घेतले. वयोवृद्ध, कोणताही परवाना नसलेले, अप्रशिक्षित, उद्धट, गुंडप्रवृत्तीचे वाहन चालक भगिरथीने कर्मचारी म्हणून भरती केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना उद्धट वागणूक, दमदाटी, मारहाण करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. वाहकाच्या बेतालपणामुळे अपघात होऊन अनेक प्रवाशांना अपंगत्व आल्याच्याही घटना घडल्या आहेत.

- Advertisement -

प्रवाशांना प्रचंड त्रास होत असतानाही भगिरथीच्या सेवेत कोणतीही सुधारणा झालेली नाही. वाहतुकीचे नियम हे बसचालक पाळत नाहीत. त्यामुळे पादचारी आणि इतर वाहन चालकांनी या बसेसचा धसका घेतला आहे. अशाच एका भरधाव बसने गुरुवारी सकाळी रस्त्याच्या कडेने जाणार्‍या चार म्हशींना जोरदार धडक दिली. या धडकेत दोन म्हशी जागीच ठार झाल्या. तर दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या. जखमी म्हशींवर उपचार सुरू आहेत.पापडी येथील एका विधवा महिलेच्या या दुभत्या म्हैशी होत्या. त्यांच्यावरच या महिलेचा उदरनिर्वाह होत होता, असे या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी बाबू मिसाळ यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -