घरमुंबई७ वर्षांच्या मुलीसाठी ती शाळकरी मुले ठरली देवदूत

७ वर्षांच्या मुलीसाठी ती शाळकरी मुले ठरली देवदूत

Subscribe

दार्जिलिंगच्या सैनिकाच्या मुलीचे वाचवले प्राण

मुंबई : रेल्वेतून खूप काळजीपूर्वक प्रवास करावा लागतो. आपल्या साहित्याची आणि लहान मुलांचीदेखील तितकीच काळजी घ्यावी लागते. कुलाबा परिसरात नेव्हीनगरमध्ये राहणार्‍या आणि मूळचे दार्जिलिंगचे असणार्‍या एका लष्कर अधिकार्‍याच्या ७ वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवण्यात दोन शाळकरी मुलांना यश आले आहे. दोन्ही मुलांनी प्रसंगावधान दाखवून त्या लहान मुलीला लोकलमधून पडताना वाचवल्याने त्यांचे खूप कौतुक होत आहे.

भारतीय लष्करात कर्तव्य पार पाडत असलेले रुपेश शरमन (३७) हे त्यांची पत्नी मरीना आणि ७ वर्षांची मुलगी साईशा हिच्यासोबत कुलाब्याच्या नेव्हीनगर परिसरात वास्तव्यास आहेत. शनिवारी सकाळी गावाकडून आलेल्या नातेवाईकांसोबत फिरायला जाण्यासाठी म्हणून ते माथेरानला जात होते. दादरमधून त्यांनी फास्ट लोकलमधून जायचे ठरवले होते. सकाळी १० च्या सुमारास ते आपल्या कुटुंबासोबत लोकलमध्ये चढत होते. मात्र, गर्दीमुळे डब्यात चढता आले नाही. यादरम्यान मुलगी साईशा आणि तिची आई डब्यात चढली होती. पण, इतर लोक चढू शकले नाहीत हे लक्षात येताच गाडी सुरू होताच आईने मुलीला डब्यातच सोडून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना या धावपळीत मुलगी डब्यात चढली आहे हे लक्षात आले नाही. यात त्यांनाही उतरताना किरकोळ जखम झाली. सगळे कुटुंब फलाटावर होते. गाडी सुरू झाली होती. पण, ७ वर्षीय साईशा लोकल डब्यात होती. आईला उतरताना पाहून तिने रडायला सुरुवात केली आणि डब्यातून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, फास्ट लोकल असल्याने लोकलने वेग पकडला होता. ती चिमुरडी लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न करतेय हे लक्षात येताच दोन शाळकरी मुलांनी तिला पकडून ठेवले आणि माटुंगा स्थानकात चेन ओढून फास्ट लोकल थांबवायला इतर प्रवाशांना सांगितले. दादरमधल्या शाळेत इयत्ता 9 वीच्या वर्गात शिकणारे इस्माईल सिराज शेख आणि महंमद तौफिक तय्यब शेख अशी या दोन बहादूर मुलांची नावे आहेत.

- Advertisement -

माटुंगा स्थानकात कर्तव्यावर असणार्‍या जीआरपीच्या जवानांनी साईशा आणि त्या दोन शाळकरी मुलांसहित दादर पोलीस ठाणे गाठले आणि साईशाला सुखरूप त्यांच्या आईवडिलांकडे सोपवले आहे. या सगळ्या प्रकाराने घाबरलेल्या आईवडिलांनी साईशाला सुखरूप आल्याचे पाहून पोलीस आणि दोन्ही मुलांचे आभार मानले आहेत. शिवाय त्या दोनही मुलांना त्या कुटुंबाने बक्षीस देऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे. पोलिसांनीसुद्धा प्रसंगावधान दाखवून साईशाचे प्राण वाचवणार्‍या इस्माईल सिराज शेख आणि महंमद तौफिक तय्यब शेख यांचा सत्कार केला असल्याची माहिती दादर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -