घरमुंबईया सरकारला बाप किती? वाचा काय म्हणाले उद्धव ठाकरे!

या सरकारला बाप किती? वाचा काय म्हणाले उद्धव ठाकरे!

Subscribe

महाविकासआघाडीचं आणि त्यासोबत महाराष्ट्राचंही भवितव्य उज्ज्वल असेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवरच्या टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

भाजपशी काडीमोड घेऊन शिवसेनेने राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकासआघाडीचं सरकार स्थापन केलं. त्याला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. या सरकारमध्ये नक्की काय चाललंय, पुढची धोरणं काय असतील, महाविकासआघाडीचं सरकार पाच वर्ष टिकेल का? या सगळ्या प्रश्नांचा नव्याने विचार सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर या सगळ्याच मुद्द्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उत्तरं दिली आहेत. विशेषत: महाविकासआघाडीतल्या तिनही पक्षांमधले सगळ्यात ज्येष्ठ, अनुभवी आणि राजकारणाचा गाढा अनुभव असलेले शरद पवार यांचं सरकारमधलं ‘वजन’ यावर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. मात्र, त्यावर उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट भूमिका मांडली आहे.

इथे रिमोट कंट्रोल नाही…

सरकारमध्ये शरद पवार रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत आहेत का? या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. ‘बाप एकच असतो आणि आईही एकच असते. इथे रिमोट कंट्रोल वगैरे काहीही नाही. आम्ही तीन पक्ष आहोत. शरद पवार देखील रिमोट कंट्रोल म्हणून वागत नाहीत. त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे ते मार्गदर्शन करतात. मीही कधी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

महाविकासआघाडीची चिंता करू नका…

दरम्यान, यावेळी महाविकासआघाडीच्या भवितव्याबद्दल कुणीही चिंता करण्याचं कारण नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं. ‘महाविकासआघाडी आणि महाराष्ट्राचंही भवितव्य उज्ज्वल आहे. महाविकासआघाडीतल्या तिनही पक्षांना आपल्या मर्यादा माहीत आहेत. त्या मर्यादांमध्येच जास्तीत जास्त टप्पा पार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जो आवाक्याबाहेरचं करायला जातो, तो आपटतो’, असं ते म्हणाले.

भाजपसाठी खिडकीही नाही, दरवाजाही नाही..

‘भाजपने स्वत:हून बाहेर पडून दरवाजे बंद करून घेतले आहेत. त्यामुळे आमच्याकडे त्यांच्या परतीसाठी खिडकी-दरवाजे असं काही नसतं. २५-३० वर्षांची सोबत फक्त राजकीय नव्हती. त्यांच्यासोबत पारिवारिक नाती निर्माण झाली होती. ती तुटताना यातना झाल्याच. यात मी आनंदीही नाही आणि रागावलोही नाही, पण दु:खी झालो. त्यांनी विश्वासघात केला’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.


हेही वाचा – नक्की करतोय काय, हे केंद्रालाही कळत नाहीये – उद्धव ठाकरे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -