घरमुंबईसोमवारी उल्हासनगर बंद; प्रांत कार्यालयाच्या कारभाराविरोधात असंतोष

सोमवारी उल्हासनगर बंद; प्रांत कार्यालयाच्या कारभाराविरोधात असंतोष

Subscribe

उल्हासनगरमधील वसनशाह दरबारच्या जागेच्या मालकी हक्काचा वाद चिघळला आहे. त्यामुळे दरबारच्या संतांनी प्रांत कार्यालयाविरोधात रॅली काढण्याचे ठरविले आहे.

उल्हासनगरमध्ये प्रांत कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या मालकी हक्काच्या सनदावरून शहरात असंतोष निर्माण झाला आहे. वर्षांनुवर्षे धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येणाऱ्या वसनशाह दरबारच्या जागेवर आता दुसऱ्या व्यक्तीची मालकी दाखवली आहे. यामुळे भक्तगणांना आश्रमात येण्यास अटकाव होणार आहे. हा जमिनीचा गैरव्यवहार असून याला प्रांत कार्यालय जबाबदार असल्याचा आरोप वसनशाह दरबारच्या संतांनी केला आहे.

उद्या सोमवारी या घटनेच्या निषेधार्थ प्रांत कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे अनेक धार्मिक संस्था आणि व्यापारी संस्थांनी जाहीर केले आहे. शनिवारी रात्री उशिरा या प्रकरणात वसनशाह दरबाराचे मुख्य साई परमानंद यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर टाकला. त्यांनी या व्हिडिओमध्ये भक्तांना मोठ्या संख्येने सोमवारी होणाऱ्या बंदमध्ये सामिल होण्याचे आवाहन केले आहे. तसेच दुपारी १२ वाजता वसनशाह दरबार येथे जमून तेथून प्रांत कार्यालयावर मोटार सायकल रॅली काढणार असल्याचे सांगितले आहे. त्याच्या काही वेळानंतर ओमी साई यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला. त्या व्हिडिओमध्ये ओमी साई यांनी, दरबार बद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी रॅलीमध्ये सामिल होण्याचे भावनिक आवाहन केले आहे. यामुळे मोर्च्यात दहा हजारपेक्षा जास्त भक्तगण सामील होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

- Advertisement -

मोर्च्यात सामील होण्याचे आवाहन

वसनशाह दरबार हा सिंधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे साई परमानंद, साई ओमी आणि साई छोटू यांच्या आवाहनानंतर शहरातील प्रमुख व्यापारी संघटना असलेल्या युटीएचे सुमित चक्रवर्ती, दिपक छतलानी, फेडरेशन ऑफ सिंधूनगर व्यापारी असोसिएशनचे नरेश दुर्गानी, सिंधूनगर व्यापारी मंडळाचे बच्चाराम रूपचंदानी यांनी सदस्य व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून मोर्च्यात सामील होणार असल्याचे संदेश सोशल मिडियावर टाकले आहेत.

प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या बदलीची मागणी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सिंधी समाजाचे एकमेव खासदार शंकर लालवाणी हे मध्यप्रदेशच्या इंदोर मधून निवडून आले आहेत. त्यांचा सत्कार समारंभ नुकताच उल्हासनगरमध्ये पार पडला. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी शंकर लालवानी यांच्यासह साई परमानंद यांची भेट घेतली. त्यावेळी प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या बदलीबाबत चर्चा झाल्याचे समजते. तसेच सोमवारच्या रॅलीमध्येही भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक सामील होणार असल्याचे गटनेते जमनादास पुरस्वानी यांनी सांगितले.

याबाबत युटीए या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यांनी सांगितले की, वसनशाह दरबार मधून आलेला संदेश हा आमच्यासाठी अंतिम आहे. त्यामुळे उल्हासनगर सोमवारी पूर्णपणे बंद असणार. तसेच आम्ही आंदोलनातसुद्धा सामिल होणार आहोत.
सुमित चक्रवर्ती, अध्यक्ष, युटीए व्यापारी संघटना
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -