घरमुंबईमालवणी नाल्यावरील १९८ बांधकामे हटवली

मालवणी नाल्यावरील १९८ बांधकामे हटवली

Subscribe

मालवणी नाल्यालगत बांधण्यात येणार्‍या या प्रस्तावित रस्त्याच्या बांधकामात अडथळा ठरणारी एकूण१९८ अनधिकृत बांधकामे तसेच पात्र व अपात्र अतिक्रमणे हटविण्याचे काम पूर्ण झाले. पी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळेे नाला रुंदीकरणासह तब्बल ६१५ मीटर लांबीचा व ६ मीटर रुंदीचा रस्ता बांधण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.

मालवणी नाल्याच्या काठी असलेल्या कारवाईच्या पहिल्या दोन टप्प्या दरम्यान १३३ बांधकामे हटविण्यात आली. त्यानंतर नुकत्याच हाती घेतलेल्या तिसर्‍या टप्प्यातील कारवाईत ६५ बांधकामे तोडण्यात आली आहे. या कारवाईमुळे अब्दुल हमीद रस्ता ते लगुन रोड या दरम्यान असणार्‍या मालवणी नाल्यालगत रस्ता बांधणे शक्य होणार आहे. ज्यामुळे भविष्यात सुमारे ४ लाख लोकवस्तीच्या परिसरातील वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर या कारवाईमुळे मालवणी नाल्याचे खोलीकरण करुन नाल्याच्या काठी भिंत बाधणे देखील शक्य होणार आहे. ज्यामुळे येत्या पावसाळ्यात या परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार असल्याची माहिती पी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी दिली.

- Advertisement -

‘परिमंडळ ७’ चे उपायुक्त रणजीत ढाकणे यांच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या या कारवाईत तिसर्‍या व अंतिम टप्प्यात स्थानिकांचा काही प्रमाणात विरोध झाला. परंतु, मुंबई पोलिसांच्या सहकार्यामुळे रस्ता बांधकामात अडथळा ठरणारी बांधकामे हटवणे शक्य झाले. या कारवाईदरम्यान सुमारे ७० पोलिसांचा ताफा घटनास्थळी तैनात होता. तर मुंबई महापालिकेचे ८० कामगार – कर्मचारी – अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते. या सोबतच ३ जेसीबी, १ पोकलेन यासह आवश्यक ती यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात आला असल्याची माहिती संजोग कबरे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -