घरमुंबईदीड कोटींचा दुर्मीळ मांडूळ सर्प हस्तगत

दीड कोटींचा दुर्मीळ मांडूळ सर्प हस्तगत

Subscribe

खर्डी वन्यजीव विभागाची कारवाई

शहापूर वन्यजीव विभागाच्या खर्डी वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांच्या पथकाने रविवारी रात्री उशिरा टाकलेल्या धाडीत दुर्मीळ वन्यजीव असलेला मांडूळ प्रजातीचा सर्प जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या छाप्यात जप्त करण्यात आलेल्या मांडूळ सर्पाची अंदाजे किंमत दीड कोटी रुपयांच्या घरात असल्याचे वन्यजीव विभागाकडून सांगण्यात येत आहे. ही ठाणे जिल्ह्यातील वन्यजीव विभागाची सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या शिकार करणार्‍या आणि वन्यजीवप्राण्यांची तस्करी करण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.

वन्यजीव विभागाने दिलेल्या माहितीनुसार औषधी पदार्थ आणि अंधश्रद्धेतून काळ्या जादुटोण्यासाठी मांडूळ सर्पाची अवैधरित्या विक्री करण्यासाठी कल्याण तालुक्यातील खोणीफाटा येथे किरण सिताराम पवार हा व्यक्ती येणार असल्याची गुप्त माहिती ठाणे वन्यजीव विभागास मिळाली होती. वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव विभागाचे खर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली वन्यजीव विभागाचे वनरक्षक चेतन डिंगोरे, विठोबा सरगर, माधव कांबळे, जालिंदर गायकवाड, राम जाधव, संदीप राठोड, चंद्रप्रकाश मौर्या यांनी खोणीनाका येथे सापळा रचला. वन्यजीव विभागाच्या पथकाने या ठिकाणी संशयास्पदरित्या वावरणार्‍या किरण पवारची झडती घेतली असता त्याच्याजवळ दुर्मिळ वन्यजीवातील मांडूळ प्रजातीचे जिवंत सर्प आढळला. याप्रकरणी किरणला अटक केली. औषधी पदार्थ आणि काळ्या जादुसाठी मांडूळ सापाचा वापर केला जात असल्याची माहिती त्याने अधिकार्‍यांना चौकशीत दिली. या सर्पाची छुप्या पध्दतीने विक्री करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही किरणने सांगितले.

- Advertisement -

छाप्यात जप्त करण्यात आलेला मांडूळ सर्पाची लांबी 145 से.मी असून 18 से.मी .गोलाई आणि त्याचे वजन 2.49 किलो आहे. विशेष म्हणजे अवैधरित्या कारवाईत जप्त करण्यात आलेला मांडूळ सर्पाची अंदाजे किंमत 1.5 म्हणजे सुमारे दिड कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती खर्डी वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -