घरमुंबईभाजीपाला, मासळी कडाडली!

भाजीपाला, मासळी कडाडली!

Subscribe

चिकन, डाळींचा ‘भाव’ वधारला

अवकाळी पावसामुळे शेतीला फटका बसलेला असताना दिवसागणिक भाजीपाल्याचेही दर वाढत आहेत. अशावेळी केव्हातरी आधार वाटणारी मासळीही कमी आवकेमुळे कडाडली आहे. त्यामुळे अनेकांना आता डाळी, कडधान्यांचा, तर काहींना चिकन, मटणाचा समावेश आहारात करावा लागत आहे.

नोव्हेंबरमध्ये बाजारात विपुल प्रमाणात येणारा भाजीपाला अनेक ठिकाणी पावसामुळे शेतातच कुजून गेला आहे. त्यामुळे बाजारात येणारा उरला सुरला भाजीपाला ग्राहकांच्या खिशाला न परवडणारा झाला आहे. वाटाणा, गवार, भेंडी, कारले, दुधी, तोंडली, फ्लॉवर, फुलकोबी, फरसबी, वांगी आदी भाज्या म्हणजे शाळकरी मुले आणि चाकरमान्यांच्या डब्याचा मुख्य आधार असतो. मात्र काही दिवसांपासून या भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने त्या डब्यातून गायब झाल्या आहेत. दोडका, गवार, वांगी आदी भाज्यांसाठी प्रति किलो 80 ते 100 रुपये मोजावे लागत आहेत. कांद्याने शंभरी पार केली आहे.

- Advertisement -

टॉमेटो 70 ते 80, तर बटाटा 35 रुपये किलोवर गेला आहे. पालेभाजी गड्डी 40 ते 50 रुपये आणि कोथिंबीर जुडी चक्क 80 ते 90 रुपयांवर पोहचली आहे. किरकोळ विक्रेते 10 रुपयाला कोथिंबीर द्यायला नकार देतात. दुसरीकडे महा चक्रीवादळामुळे समुद्रातील मासेमारी बंद असल्याने बाजारात मासळीची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम दरात वाढ होण्यात झाला आहे. खाडी आणि तलावातील मासळीला मागणी वाढली आहे. परंतु तीही खिश्याला सहज परवडणारी नाही. फंटुस 250 रुपये किलो, कटला 300, तर जिताडा 600 रुपये किलोने विकला जात आहे. चिंबोरी 40 ते 50 रुपये प्रतिनग दराने विकली जात आहे. स्वाभाविक मासळी खाणेही परवडत नसल्याने मांसाहारींनी चिकन आणि मटणाला, तर शाकाहारींनी कडधान्याला पसंती दिली आहे.

ऑक्टोबर महिन्यातील कोथिंबीर वगळता इतर भाज्यांचे प्रति किलो दर (कंसातील आकडे नोव्हेंबरमधील)ः भेंडी 100 (१२०), कोबी 100 (१३०), तोंडली 60 ते 70 (८० ते ९०), काकडी 60 ते 70 (८० ते ९०), बटाटा 40 (४०), फरसबी 80 (१००), भोपळा 80 (१००), दुधी 60 (८०), हिरवी मिरची 120 (१६०) आणि कोथिंबीर जुडी 60 (८०).

- Advertisement -

भाज्या, मासळीचे दर वाढल्याने रोजच्या जेवणामध्ये आता कडधान्य आणि डाळींचा वापर जास्त प्रमाणात करावा लागतोय.
-कविता पाटील, गृहणी, पेण

भाज्यांची आवक कमी झाल्याने दर वाढले, परिणामी ग्राहकांकडून भाज्यांची खरेदी कमी होत आहे.
-प्रवीण पाटील, भाजी विक्रेता

बाजारात भाज्या, मासळीचे दर वाढल्याने कडधान्य आणि डाळींची मागणी ग्राहकांकडून वाढली आहे.
-रमेश पाटील, किराणा दुकानदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -