घरमुंबईपैशांसाठी तरुणीला धमकाविणार्‍या डॉक्टरला अटक

पैशांसाठी तरुणीला धमकाविणार्‍या डॉक्टरला अटक

Subscribe

स्टोन बनविण्यासाठी दिलेला धनादेश बँकेत न वटता परत आल्याने एका 21 वर्षांच्या तरुणीला पैशांसाठी धमकी देणार्‍या एका डॉक्टरलाच मंगळवारी कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. महावीर अर्जुनसिंह राठोड असे या 29 वर्षीय डॉक्टर नाव असून खंडणीच्या याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पाच दिवसांची पोलीस केाठडी सुनावली आहे. यातील तक्रारदार 21 वर्षांची तरुणी असून ती कांदिवलीतील चारकोप परिसरात राहते. ती एका खासगी बँकेच्या डीएसएच्या बँक ऑफिसमध्ये कामाला आहे.

तीन वर्षांपूर्वी त्यांच्या बँकेत राजू नावाच्या एका व्यक्तीने क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला होता. त्यामुळे त्याच्या कागदपत्राची फाईल घेण्यासाठी गेली होती. यावेळी राजूने तिची ओळख महावीर राठोडशी करुन दिली होती. महावीर हा डॉक्टर असून तो एखाद्या व्यक्तीचा चेहरा आणि हात पाहून त्याचे भविष्य सांगतो असे सांगितले होते. जुलै 2019 रोजी तिची पुन्हा महावीरशी ओळख झाली होती. यावेळी त्याने तिचा भविष्य सांगण्यास सुरुवात केली. तिच्याविषयी काही माहिती सांगून त्याने तिलाा विश्वास घेऊन एक स्टोन धारण करण्यास सांगितले, हा स्टोन धारण केल्यास तिच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आणि तिची खूप प्रगती होईल असेही सांगितले. त्याच्या आमिषाला बळी पडून ती तयार झाली होती. त्यानंतर त्याने तिला धार्मिक विधी करुन एक अंगठी बनविण्यासाठी 70 हजार रुपयांची मागणी केली. मात्र ही रक्कम जास्त असल्याने तिने 50 हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. यावेळी त्याने तिला एक अंगठी दिली होती. त्यानंतर तो पेमेंटसाठी तिच्याकडे तगादा लावत होता. त्यामुळे तिने तिच्या आईच्या बँक खात्यातील 50 हजार रुपयांचा एक धनादेश त्याला दिला होता. तो धनादेश बँकेत न वटता परत आला होता. त्यामुळे त्याने तिला फोन करुन तिने त्याची फसवणूक केल्याचा आरोप करुन तिच्याकडून डबल पैशांची मागणी सुरु केली. तसेच तिने एक लाख रुपये दिले नाहीतर तिच्यासह तिच्या आई-वडिलांविरुद्ध पोलिसांत तक्रार करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करु अशी धमकी दिली होती. त्याच्याकडून तिला सतत धमक्या मिळत होत्या. त्यामुळे तिने चारकोप पोलिसांना हा प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती.

- Advertisement -

याप्रकरणी गुन्हा नोंद होताच त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. हा तपास हाती येताच पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या पथकातील चिमाजी आढाव, रईस शेख, शरद झिने, मसवेकर, पाटील व अन्य पोलीस पथकाने कांदिवली येथून डॉ. असलेल्या महावीर राठोडला अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला सोमवार 11 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -