घरमुंबईआयपीएल सामन्यावरील बेटींगप्रकरणी वॉण्टेड बुकीला अटक

आयपीएल सामन्यावरील बेटींगप्रकरणी वॉण्टेड बुकीला अटक

Subscribe

आयपीएल सामन्यावरील बेटींगप्रकरणी गेल्या पाच वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या एका बुकीला मंगळवारी अटक केली. गेल्या पाच वर्षांपासून मनन नायर हा पोलिसांना चकवा देत होता. अटकपूर्व जामिनासाठी याचिका सादर करुन पोलिसांची दिशाभूल करीत होता. अखेर त्याला मंगळवारी खंडणीविरोधी पथकाने अटक केली.

आयपीएल सामन्यावरील बेटींगप्रकरणी गेल्या पाच वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या एका बुकीला अखेर मंगळवारी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. मनन अनिलकुमार नायर (३५) असे या बुकीचे नाव असून याच गुन्ह्यांत त्याला येथील लोकल कोर्टाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. २०१२ साली बेटींग घेणाऱ्या सोनू जलान या मुख्य बुकीसह १३ जणांना पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यांत मनन नायर हा वॉण्टेड होता. २०१२ साली या टोळीने आयपीएलवरील सुरुवातीच्या काही सामन्यांवर बारा कोटी रुपयांचे बेटींग घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेने या गुन्ह्यांत अन्य काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या गुन्ह्यांत सुनिल मिरचंदानी उर्फ दुबई, सुनिल कलकत्ता उर्फ बाबरी, अरुण शिवरे, पिंटू आदर्श, राजेश दहिसर, राकेश, त्रिमूर्ती नारायण व इतर आरोपींना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

 ६ जणांना अटक

कांदिवलीतील एका पॉश अपार्टमेंटमध्ये आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि इलेव्हन पंजाब या दोन संघामधील सामन्यावर बेटींग सुरु असल्याची माहिती प्रॉपटी सेलच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर १७ मे २०१२ रोजी या पथकाने कांदिवलीतील लोखंडवाला टाऊनशीप, आकुर्ली रोडवरील व्हिस्पिरिंग अपार्टमेंटच्या सी विंगच्या फ्लॅट क्रमांक १८०१ मध्ये छापा टाकला. त्यात देवेंद्र श्रीपाल कोठारी, सोनू योगेंद्र जलान, राजेंद्र मोतीराम शिरवडकर, दर्शन अशोक गोहिल, मोहम्मद इक्बाल रफिक तुरक, राजकुमार सोनीलाल राय आणि फिरोज फरीद अन्सारी या सहाजणांना अटक केली होती.

- Advertisement -

साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

घटनास्थळाहून पोलिसांनी ३० मोबाईल, सिमकार्ड, दोन लॅपटॉप, दोन वॉईस रेकार्डर, आठ स्पिकर, एक एलसीडी आणि सव्वापाच लाख रुपयांची कॅश असा सुमारे साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यातील सोनू जलान हा मुख्य आणि टॉप मोस्ट बुकी आहे. त्यांच्या चौकशीनंतर त्याचे इतर सात साथीदार प्रकाशकुमार मिरछुमल चंदनानी, अब्दुल रौफ वाघू, कांतीलाल भिमजी शहा, अमीत जयंतीलाल पोपट, अरविंद श्रीनाथ चर्तुवेदी आणि अशोक धिरजलाल कामगार उर्फ रॉयल यांना पोलिसांनी अटक केली होती.

वॉण्टेड आरोपी

या १३ आरोपींविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र सादर केले आहेत. त्यात मनन नायरसह इतर आरोपींना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते. गेल्या पाच वर्षांपासून मनन नायर हा पोलिसांना चकवा देत होता. अटकपूर्व जामिनासाठी याचिका सादर करुन पोलिसांची दिशाभूल करीत होता. अखेर त्याला मंगळवारी खंडणीविरोधी पथकाने अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

युकेच्या एका वेबसाईटचा वापर

सट्टा घेण्यासाठी या टोळीने युकेच्या एका वेबसाईटचा वापर केला होता. या वेबसाईटच्या माध्यमातून ही बेटींग घेतली जात होती. गेल्या काही वर्षांत त्यांनी ५०० हून अधिक कोटी रुपयांचे बेटींग घेतल्याचे आरोपी बुकींच्या जबानीवरून निष्पन्न झाले आहे. या बेवसाईटला भारतात बंदी असून सहा वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांनी केंद्र सरकारकडे ही वेबसाईट बंदी करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. मात्र ही बेवसाईट बंदी झाली नसल्याचे सांगण्यात आले. मनन हादेखील पाकिस्तानी बुकींच्या संपर्कात होता. गेल्या सहा ते सात वर्षापासून तो बेटींग जगतात सक्रिय आहे. त्याने बेटींगसाठी वापरलेल्या सिमकार्ड, लॅपटॉप, मोबाईलचा शोध घेणे बाकी असून त्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

कोट्यवधी रुपयांचे बेटींग घेत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस

आयपीएल सामन्यावर बेटींग घेणारी ही सराईत टोळी असून सोनूच्या आदेशावरून ही टोळी पाकिस्तानासह इतर देशातील बुकींशी संपर्क साधून कोट्यवधी रुपयांचे बेटींग घेत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मनन हा देवेंद्र आणि सोनू यांच्या संपर्कात होता. या दोघांच्या आदेशावरून त्याने पाच वर्षांपूर्वी आयपीएल सामन्यावर सुमारे दहा ते बारा कोटी रुपयांचे बेटींग घेतल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -