घरमुंबईभाजपच्या एकाधिकारशाहीसमोर पर्याय द्यावाच लागेल!

भाजपच्या एकाधिकारशाहीसमोर पर्याय द्यावाच लागेल!

Subscribe

‘महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेचे ढग असल्याचे चित्र निर्माण करून महाराष्ट्रात उलथापालथ करण्याचे डावपेच सध्या भाजपकडून खेळले जात आहेत. यासाठी बरेचजण देव पाण्यात बुडवून बसले आहेत. मात्र, भाजपच्या एकाधिकारशाहीला पर्याय द्यायचा असेल तर शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र राहिले पाहिजे आणि मला खात्री आहे पूर्ण पाच वर्ष हे सरकार चालेल...’ असा विश्वास शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. माय महानगरला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडी सरकार, शिवसेना आणि उद्योग खाते याविषयी संजय परब यांच्याशी केलेली ही विशेष बातचीत...

महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेचे ढग आहेत का?
– बरेचजण असे पाण्यात देव बूडवून बसले आहेत. त्यांना असं वाटत होतं की आपण असे ध्रूव तार्‍यासारखे अढळ आहोत. त्यांनी अशी अपेक्षाच केली नव्हती की आमचं सरकार पुन्हा येईल. परंतु उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची मुत्सद्देगिरी यामुळे महाविकास आघाडी जन्माला आली. आम्ही त्याला पुरून उरलो. शिवसेनेला तुच्छ मानायचं, शिवसेनेला फरफटत मागे न्यायचं हे जे धोरण होतं, त्याचा उबग आला होता. हे चालणार नाही. आमचा नुसता उपयोग करणार असाल तर हे कदापी सहन करणार नाही. आम्हाला पण ताकद आहे, आमचा पण स्वाभिमान आहे. तो शेवटी आम्ही दाखवून दिला. कोणाची एकाची मनमानी चालणार नाही. सर्वांना सोबतीनं घेऊन चालणं ही भारतीय राजकारणाची संस्कृती आहे. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करायचं ठरवलं. ते चांगल्याप्रकारे चाललं आहे. मात्र, सरकार ही जशी शिवसेनेची गरज आहे, तशी आमच्या दोन साथीदारांची देखील आहे. मुख्य म्हणजे भाजपच्या एकाधिकारशाहीला पर्याय द्यायचा असेल तर आपल्याला एकत्र राहिलं पाहिजे आणि मला खात्री आहे पूर्ण पाच वर्ष हे सरकार चालेल.

पक्ष म्हणून शिवसेनेचा सध्या कसा प्रवास सुरू आहे?
– उत्तम चालू आहे. कोरोनामुळे व्हर्च्युअल बैठका सुरू आहेत. कोरोनाच्या काळात जाहीर कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे जे भव्य दिसायला पाहिजे ते दिसत नाही, पण शिवसेनेचे पक्ष म्हणून जोरात काम सुरू आहे. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून सर्व कार्यकर्त्यांशी व्हर्च्युअली कनेक्ट असतात. उद्धव ठाकरे हे आता मुख्यमंत्री असले तरी पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांची अजिबात पकड ढिली झालेली नाही. शहरी मुखवटा असलेला पक्ष म्हणून विरोधक आजही आमच्यावर टीका करत असले तरी ग्रामीण भागात आमचा जनाधार वाढत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आम्ही पहिल्या क्रमांकाची चांगली कामगिरी केली. जळगाव, नगर महापालिकांमध्ये आम्ही सरस ठरलो आहोत.

- Advertisement -

कोरोनाच्या काळात उद्योग खात्याची काय स्थिती आहे?
गेले दीड वर्ष कोरोनाच्या काळात गेलं. कठीण असा कालखंड आहे. अजूनही हे संकट संपलेलं नाही. मार्च 2020 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आणि मार्चमध्ये भारत सरकारने अचानक लॉकडाऊन लागू केला. सगळं ठप्प केलं. पण त्याच वेळेला त्यांनी ही अपेक्षा केली की आपलं अर्थकारण चालू राहिलं पाहिजे. त्याच नियमांचा लाभ घेत महाराष्ट्राच्या उद्योग खात्याने सगळं उद्योग चक्र व्यवस्थित चालू रहावं, कारखाने, उद्योगधंदे सुरु ठेवण्यासाठी आम्ही नियमावली तयार केली आणि उद्योगांसाठी दारं उघडी करून दिली. तेव्हापासून कारखाने सुरू झाले. उद्योगांसाठीचे उत्पादन सुरू झालं. पर्यायानं जे बेरोजगार झाले होते, त्यांना रोजगार मिळू लागला. कच्चा, पक्क्या मालाची वाहतूक असू द्या, निर्यात करणार्‍या उद्योगधंद्यांना, अत्यावश्यक सेवेतील उद्योगांना, अन्न प्रक्रिया करणार्‍या उद्योगांना आम्ही पूर्ण चोवीस तासांची सवलत दिली. तसंच इतर उद्योगांना देखील नियम पाळून कामकाज चालू ठेवावं यासाठी सोय करून दिली. त्याचा फायदा असा झाला की, महाराष्ट्र पूर्वपदावर येऊ लागला. विशेष म्हणजे इतर क्षेत्रांमधून व्यवसाय सुरू करायला द्या, अशा तक्रारी येत होत्या. पण उद्योगांकडून त्या आल्या नाहीत. कारण आम्ही आधीच त्यांच्या तक्रारी ओळखून त्या प्रमाणे उद्योगाची चक्रे सुरू ठेवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -