घरमुंबईका झाला अमळनेरमध्ये भाजप नेत्यांमध्ये राडा? आतली बातमी

का झाला अमळनेरमध्ये भाजप नेत्यांमध्ये राडा? आतली बातमी

Subscribe

भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि त्यांच्या समर्थकांनी भर कार्यक्रमात मंचावर माजी आमदार बी. एस. पाटील यांना मारहाण केली आहे. या मारहाणीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनादेखील धक्काबुक्की झाली.

खान्देशातील भाजप नेत्यांचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याच्या बऱ्याच घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी धुळे महापालिका निवडणुका झाल्या. या निवडणुकीवेळीदेखील एका कार्यक्रमात मंचावरच असाच राडा पाहायला मिळाला होता. परंतु, पोलिसांमुळे तो लवकर निवळला होता. धुळ्याचे भाजपचे आमदार अनिल गोटे विरुद्ध खान्देशातील इतर भाजप नेते असा गट त्यावेळी पाहायला मिळाला होता. हा राडा मंचावरच झाला होता आणि त्या कार्यक्रमात जलसंपदा गिरीश महाजन स्वत: उपस्थित होते. बुधवारी पुन्हा तशाच एका राड्याची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, हा राडा पहिला राड्यासारखा लवकर निवळला गेला नाही. या राड्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि त्यांच्या समर्थकांनी अमळनेरचे माजी आमदार बी. एस. पाटील यांना मारहाण केली. या मारहाणीदरम्यान, गिरीश महाजन यांनादेखील धक्काबुक्की झाल्याचे पहायला मिळाले. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियातून उदय वाघ यांच्यावर टीका होत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

बुधवारी जळगाव जिलह्याच्या अमळनेर येथे सेना-भाजपा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाजपचे नेते गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार बी. एस. पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ मंचावर उपस्थित होते. दरम्यान, उदय वाघ यांच्या समर्थकांनी बी. एस. पाटील यांना मंचावरुन खाली उतरवा अशी घोषणाबाजी केली. यावेळी वाघ आणि पाटील यांच्यात काही शाब्दिक मारामारी झाली आणि त्याचे रुपांतर नंतर खऱ्याखुऱ्या हाणामारीत झाले. उदय वाघ यांनी बी. एस. पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केल्यानंतर वाघ समर्थक मंचावर आले आणि त्यांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली. उदय वाघ यांनी यामागील स्पष्टीकरण दिले आहे. उदय वाघ यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघ यांच्या बाबतीत आक्षेपार्य वक्तव्य केल्यामुळे मारहाण केल्याचे त्यांनी सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर बी. एस. पाटील यांनी आपण आक्षेपार्य टीका केलेली नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

तिकीट कापल्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघासाठी भाजपकडून विद्यमान आमदार ए. टी. नाना पाटील यांचे तिकीट कापले गेले. हे तिकीट अमळनेरच्या विद्यमान आमदार स्मिता वाघ यांना देण्यात आले. त्यामुळे ए. टी. पाटील चांगलेच भडकले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी दोन आठवड्यांपूर्वी पारोळा येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात माजी आमदार बी. एस. पाटील देखील उपस्थित होते. या मेळाव्यादरम्यान बी. एस. पाटील यांनी उदय वाघ यांच्यावर जोरदार टीका केली होती. ‘ए. टी. पाटील दोन वेळा मतदारसंघातून निवडूण आले आहेत. मतदारसंघात काम चांगले असतानाही त्यांचे तिकीट कापले गेले. त्यांचे तिकीट कापले जावे, यासाठी उदय वाघ गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करत होते. उदय वाघ यांनीच पक्षश्रेष्ठींना सांगून ए.टी. नानांचे तिकीट कापून आपल्या पत्नीला द्यायला लावले. स्मिता वाघ यांनी अमळणेर मतदारसंघात काय कामे केली आहेत, ती आम्हाला चांगले माहित आहे’, अशी टीका उदय वाघ यांनी केली होती. त्यानंतर काही दिवसांनी भाजपने स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करुन उन्मेश पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. स्मिता वाघ यांचे तिकीट कापण्यामागे बी. एस. पाटील यांची महत्त्वाची भूमिका होती, अशी समज वाघ यांची आहे. याशिवाज पक्षश्रेष्ठींशी समजूत काढून स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करण्यामागे बी. एस. पाटील यांचा हाथ आहे. याशिवाय, स्मिता वाघ यांच्या संदर्भात बी. एस. पाटील यांच्याबाबत आक्षेपार्य वक्तव्य केल्याचा आरोप उदय वाघ यांनी केला होता. त्यामुळे उदय वाघ यांचा बी. एस. पाटील यांना मंचावर न बोलवण्याचा आग्रह होता. परंतु, पक्षाचे माजी आमदार म्हणून त्यांना पक्षाकडून निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमात बी. एस. पाटील मंचावर आल्यावर वाघ यांनी त्यांना मारहाण केली आणि मोठा राडा झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -