घरमुंबईभंगारात पडलेल्या ४ मोनो ट्रेन होणार दुरुस्त

भंगारात पडलेल्या ४ मोनो ट्रेन होणार दुरुस्त

Subscribe

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मोनोरेलच्या ऑपरेशनचा ताबा घेतल्यानंतर मोनोरेलच्या फेर्‍या वाढवण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. या उद्दिष्टासाठी भंगारात पडलेल्या मोनोरेलच्या ट्रेन दुरुस्त करण्यासाठी आता प्राधिकरणाने जोरदार तयारी सुरू केली आहे. एमएमआरडीएचा भाग असलेल्या मुंबई मेट्रो मोनोरेल कॉर्पोरेशन (एमएमओसीएल) ने याकरिता दुसर्‍यांदा निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार लवकरच १६० कोटी रुपये किमतीच्या भंगारात पडलेल्या एकूण ४ मोनोरेलच्या ट्रेन तातडीने दुरुस्त करून त्या चालवण्यात येणार आहेत.

एक मोनोरेल ट्रेन नव्याने खरेदी करायची असेल तर ४० कोटी रुपये मोजावे लागतात. त्यामुळेच स्पेअर पार्टच्या मदतीने भंगारातील मोनोरेलच्या ट्रेनची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तब्बल ८३ लाख रुपयांचा खर्च या भंगारात पडलेल्या ट्रेनच्या दुरुस्तीसाठी येणार आहे. या दुरुस्तीचे कंत्राट मिळणार्‍या कंपनीने ३ महिन्यांच्या कालावधीत या ट्रेन ऑपरेशनसाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी एमएमओसीएलची अट आहे. सध्या एकूण तीन मोनोरेल ट्रेनच्या माध्यमातून मोनोरेलचे चेंबूर ते वडाळा या अंतरादरम्यानचे ऑपरेशन चालते. याआधी १ फेब्रुवारीपासून मोनोरेलचे ऑपरेशन महालक्ष्मीपर्यंत सुरू होईल, असा अंदाज एमएमआरडीएने बांधला होता. पण, जादा फेर्‍यांसाठी आणि मोनोरेलचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी जास्त ट्रेन उपलब्ध होणे गरजेचे होते. शिवाय मोनोरेलचा वडाळा ते महालक्ष्मी (संत गाडगेबाबा महाराज चौक) दरम्यानच्या दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी एमएमओसीएलमार्फत ५ आणखी ट्रेन खरेदी करण्यात येणार आहे, असे एमएओसीएलच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

- Advertisement -

लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो आणि स्कोमी इंजिनिअरिंग बीएचडी यांची संयुक्त कंपनी असलेल्या एलटीएसई या कंपनीसोबतचा मोनो रेल्वेसाठी २००८ साली झालेला २५ वर्षांचा करार गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एमएमआरडीएमार्फत रद्द करण्यात आला होता. करार रद्द करण्याआधी कंपनीला पुरेपूर संधी देण्यात आली होती. पण, मोनोरेलच्या टप्प्यासाठी ट्रेनचा पुरवठा करणे, वाहतूक व्यवस्थेचे संचालन आणि व्यवस्थापन तसेच करारातील कलमांची पूर्तता करणे या सगळ्या बाबतीत कंपनीला अपयश आल्यानेच ही कारवाई एमएमआरडीएमार्फत करण्यात आली. मोनोरेलचा दुसरा टप्पा सुरू करण्यातही या कंपनीला सपशेल अपयश आले असल्याचा ठपका एमएमआरडीएमार्फत ठेवण्यात आला होता. त्यामुळे या कंपनीची २०० कोटी रुपयांची हमीपोटी दिलेली रक्कम एमएमआरडीएने ताब्यात घेतली आहे.

मोनोच्या प्रवासांची संख्या वाढते
सध्या मोनोरेलच्या चेंबूर ते वडाळा दरम्यानच्या टप्प्यासाठी दररोज १० हजार ते १५ हजार इतक्या प्रवाशांमार्फत मोनोरेलचा वापर होतो. तर, चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक दरम्यानचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर दिवसापोटी दीड लाख ते तीन लाख प्रवासी मोनोरेलने प्रवास करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -