घरपालघरजिल्हयात आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पासाठी 283 कोटींचा निधी मंजूर

जिल्हयात आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पासाठी 283 कोटींचा निधी मंजूर

Subscribe

. या बैठकीसाठी मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार राजेश पाटील, मदत पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, आपत्ती व्यवस्थापन संचालक आप्पासाहेब धुळाज, रस्ते विकास विभागाचे सचिव साळुंखे, माजी महापौर नारायण मानकर, माजी महापौर प्रवीण शेट्टी, रमेश कोटी उपस्थित होते.

वसईः मुसळधार पाऊस, वादळ, भूस्खलन अशा अनेक नैसर्गिक आपत्तींची तीव्रता कमी व्हावी, यासाठी स्थापन झालेल्या कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाचे काम जोरात सुरू झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात याबाबतची बैठक पार पडली. या बैठकीत पालघर जिल्ह्यातील विविध कामांसाठी तब्बल 283 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून भूमीगत विद्युतवाहिनी, आपत्ती निवारा केंद्रांची उभारणी आणि धुप आणि खार प्रतिबंधक बंधारे उभारण्याचे काम होणार आहे. या बैठकीसाठी मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार राजेश पाटील, मदत पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, आपत्ती व्यवस्थापन संचालक आप्पासाहेब धुळाज, रस्ते विकास विभागाचे सचिव साळुंखे, माजी महापौर नारायण मानकर, माजी महापौर प्रवीण शेट्टी, रमेश कोटी उपस्थित होते.

पाऊस काळात कोकण किनारपट्टीवर प्रचंड जोरात वारे वाहतात. या वार्‍यांमुळे अनेक झाडे जमीनदोस्त होतात. या झाडांसह अनेकदा विजेच्या तारा पडण्याच्या घटना घडून वीज खंडित होते. त्याशिवाय पूर किंवा दरड कोसळल्याने तात्पुरत्या निवार्‍याची गरज भेडसावते. या सर्वच आपत्तींचा आगाऊ विचार करून त्या आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाची आखणी केली गेली. या प्रकल्पाअंतर्गत पालघर जिल्ह्यात उच्च दाबाच्या 307 किलोमीटर आणि लघुदाबाच्या 766 किलोमीटर लांबीच्या भूमिगत विद्युत वाहिनी टाकल्या जाणार आहेत. त्याशिवाय जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी आणि वसई या चार तालुक्यांमध्ये एकूण 8 बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र उभारली जाणार आहेत.

- Advertisement -

या सर्व कामांसाठी बहुजन विकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे वेळोवेळी निवेदन सादर केले होते. तसेच कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पातून ही कामे केली जावीत, यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह पत्रव्यवहारही केला होता. या प्रयत्नांना अखेर यश आले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. या प्रकल्पांसाठी तब्बल 283 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या 283 कोटींपैकी 200 कोटी रुपये भूमिगत विद्युत वाहिनींचे जाळं तयार करण्यासाठी वापरले जाणार असून निवारा केंद्रांसाठी 13 कोटी रुपये खर्च केले जातील. उर्वरीत 70 कोटी रुपयांमधून जिल्ह्यातील 11 ठिकाणी धूप प्रतिबंधक आणि 19 ठिकाणी खार प्रतिबंधक बंधारे बांधले जाणार आहेत.

पालघर जिल्ह्यात पावसाळ्यादरम्यान झाडे पडून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये पश्चिम किनारपट्टीवर सातत्याने चक्रीवादळे येत होती. या चक्रीवादळांमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले. अनेकांना आपल्या घरांना मुकावे लागले. अशा लोकांसाठी तात्पुरता निवाराही उपलब्ध करावा लागतो. या कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. हे काम तडीस नेल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया आमदार क्षितीज ठाकूर यांनी दिली.

- Advertisement -

000

भूमिगत विद्युतवाहिनी कुठे?

पालघर तालुका – माहीम, वडराई, शिरगाव, उसरणी, दांडा, खटाळी, मथाने, एडवान, कोरे, दातिवरे, केळवे रोड, दांडी, उचेली, ऊनभात, घिवली, तारापूर, काम्बोडे, नांदगाव, आलेवाडी, पाम, टेंभी, मुरबे, नवापूर

डहाणू तालुका- चिंचणी, बोर्डी, बोरिगाव, डहाणू गाव, नरपड, चिखला, आंबेवाडी, घोलवड.

000

बहुउद्देशीय निवारा केंद्र कुठे?

पालघर तालुका – एडवण, उसरणी, जिल्हा परिषद शाळा माहीम खारपाडा,जिल्हा परिषद शाळा सातपाटी फिशरी

डहाणू तालुका – जिल्हा परिषद शाळा डहाणू नंबर 1, जिल्हा परिषद शाळा चिंचणी नंबर 1,

वसई तालुका – जिल्हा परिषद शाळा चिखल डोंगरी

तलासरी तालुका – जिल्हा परिषद शाळा झाई

000

जास्त निधी लागला, तरी तरतूद करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पातील सर्वच कामं अत्यावश्यक आहेत. या कामांमुळे किनारपट्टी भागात राहणार्‍या लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यात या भागातील लोकांचे हाल होतात. मात्र, या प्रकल्पानंतर त्यांना बराच दिलासा मिळेल. त्यामुळे या प्रकल्पातील कामे पूर्ण करण्यासाठी जास्त निधी लागला, तरी पुरवणी मागण्यांद्वारे तो पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -