घरमुंबई'माझी माती, माझा देश' अभियानातही महाराष्ट्र अव्वल राहील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

‘माझी माती, माझा देश’ अभियानातही महाराष्ट्र अव्वल राहील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

Subscribe
मुंबई : ‘माझी माती, माझी माणसे’ हे अभियान महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात राबविले जाणार आहे. ‘हर घर तिरंगा’ या अभियानाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर होता. ‘इंडिया @75’ या उपक्रमात 10,64,410 कार्यक्रम संपन्न झाले. अगदी त्याचप्रमाणे ‘माझी माती माझा देश’ या अभियानातही महाराष्ट्र अव्वल राहील, असा आत्मविश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra will also be top in the Majhi Mati Maja Desh campaign Faith in Chief Minister Eknath Shinde)
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ गत वर्षभरात राबविण्यात आला. या महोत्सवाचा समारोप ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाने होत आहे. त्यांचा मुख्य सोहळा बुधवारी ऑगस्ट क्रांती मैदानात संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
या कार्यक्रमाप्रसंगी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, आमदार मनीषा कायंदे, आमदार आशिष शेलार, आमदार यामिनी जाधव, आमदार सदा सरवणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल,अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आदी मान्यवर उपस्थित होते.
ब्रिटिश राजवटीत 9 ऑगस्ट क्रांतीदिनी क्रांतिकारक, देशभक्तांनी ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला होता. तसेच, स्वातंत्र्याची बिजेही याच मैदानातून रोवली गेली. त्याचप्रमाणे, महात्मा गांधींनी ‘करो या मरो’ ची घोषणा देऊन तरुणांमध्ये देशभक्तीची चेतना जागवली होती. अखेर ब्रिटिशांना देश सोडून जावे लागले.  स्वातंत्र्याचा ओंकार महाराष्ट्राच्या भूमिमधूनच उमटला. छत्रपती शिवाजी महाराज, संत, समाजसुधारक, क्रांतीवीर, देशभक्त यांची फळी या देशाला महाराष्ट्राने दिली. देश स्वातंत्र्यासाठी ज्या देशभक्त, राष्ट्रभक्त, क्रांतीवीर यांनी आपले बलिदान दिले, आहुती दिली ते हुतात्मे झाले. त्यांना अभिवादन करतो. आज त्यांच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले व स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. आज देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात ‘स्वदेश’, ‘स्वधर्म’ आणि ‘स्वाभिमान’ जागृत झाला आहे’. या मंत्राचा जागर करणे आपले कर्तव्यच आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

निंदकांचे घर असावे शेजारी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईसह महाराष्ट्रात चांगले काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत विकासकामे, सुशोभिकरण आदी चांगली कामे होत आहेत. मात्र काही लोकांच्या पोटात दुखत आहे. ते वारंवार पत्र लिहीत आहेत. त्यांनी 25 वर्षे पत्र लिहिली असती तर, मुंबई अधिक चांगली झाली असती. आयुक्त चहल तुम्ही मुंबईसाठी विकास कामे करत राहा. त्यामुळे मुंबई खड्डे मुक्त होईल. मात्र निंदकांचे घर असावे शेजारी, असे टोमणे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव आणि आदित्य ठाकरे यांची नावे न घेता मारले.

स्वातंत्र्य चळवळीत मुंबईकर आघाडीवर – उपमुख्यमंत्री अजित पवार

स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन अशा अनेक आंदोलनात मुंबईकर नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. मुंबईवर येणारी अनेक नैसर्गिक संकटे व आपत्ती यांच्या आव्हानांवर मात करत मुंबईकरांनी ‘मुंबई स्पिरीट’ कायम ठेवले आहे, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईकरांचे जाहीर कौतुक केले.
ऑगस्ट क्रांती मैदानाचा ऐतिहासिक वारसा जतन व्हावा, याअनुषंगाने काही सूचना मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांना केल्या होत्या. महापालिका प्रशासनाने विविध दर्जेदार कामे करून या मैदानातील ऐतिहासिक वारसा जतन करण्याची जी कामगिरी बजावली आहे, ती वाखाणण्याजोगी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी ऑगस्ट क्रांतीस्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या नावांची नोंद असलेल्या ‘शिलाफलका’चे अनावरण आणि ‘वसुधा वंदन’ अंतर्गत वृक्षारोपणही करण्यात आले. तसेच, राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉन रॅलीला यावेळी मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -