घरपालघरबेकायदा गौणखनिज उत्खनन प्रकरणी ३ कोटी ४० लाखांचा दंड

बेकायदा गौणखनिज उत्खनन प्रकरणी ३ कोटी ४० लाखांचा दंड

Subscribe

पालघर महसूल विभगाला कोट्यवधी रूपयांचा चुना लावल्याप्रकरणी खाण मालकांना त्यांच्याकडील सर्व कागदपत्रासहीत लेखी खुलासा करण्यासाठी १७ नोव्हेंबरला पालघरच्या तहसीलदार कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

बोईसर : पालघर तालुक्यातील वाडा – खडकोना येथील बेकायदा गौणखनिज उत्खनन प्रकरणी महसूल विभागाने खाण मालकाला ३ कोटी ४० लाखांचा दंड ठोठावून दणका दिला आहे.या प्रकरणी १७ नोव्हेंबरला सुनावणी ठेवण्यात आली आहे.
मंडळ अधिकारी लालोंडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आणि भूमी अभिलेख विभाग पालघर यांच्यामार्फत पुन्हा एकदा १८ ऑक्टोबरला या खाणीची संयुक्तपणे पाहणी करून मोजणी करण्यात आली.यामध्ये एकूण ६०२४ ब्रास दगडाचे बेकायदा उत्खनन केल्याचे निष्पन्न होऊन दंडात्मक कारवाईसाठी तसा अहवाल पालघरच्या तहसीलदारांना पाठविण्यात आला होता.या अहवालाच्या आधारे तहसीलदारांनी ६०२४ ब्रास अनधिकृत गौणखनिज उत्खनन प्रकरणी खाण मालकांना तब्बल ३ कोटी ४० लाख ५ हजार ४८० रूपयांचा दंड ठोठावला आहे.गौणखनिज उत्खननासाठी शासनाची कोणतीही परवानगी न घेता तसेच स्वामित्वधन बुडवून पालघर महसूल विभगाला कोट्यवधी रूपयांचा चुना लावल्याप्रकरणी खाण मालकांना त्यांच्याकडील सर्व कागदपत्रासहीत लेखी खुलासा करण्यासाठी १७ नोव्हेंबरला पालघरच्या तहसीलदार कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

वाडा -खडकोना गावात जय अंबे ढाबाच्या मागे असलेली ही बेकायदा खाण मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी जवळ आहे.जवळपास आठ एकर जागेवर असलेल्या या खाणीतून गेल्या वीस वर्षापासून अव्याहतपणे गौणखनिज काढले जात होते.या खाणीच्या अगदी लगत १०० फूट अंतरावर आदीवासी पाडा असून खाणीतील दगड फोडण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या जिलेटीनच्या स्फोटांनी या आदीवासी पाड्यातील लोकांच्या घरांना तडे गेले असून स्फोटानंतर उडालेले दगड थेट घराच्या छपरावर पडत असल्याने नागरिक अक्षरक्ष: भीतीच्या छायेखाली जगत आहेत.महसूल विभागाच्या कारवाईनंतर आता ही बेकायदा खाणीतील उत्खनन बंद करण्यात आल्याने पाड्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दैनिक आपलं महानगर ने १३ ऑक्टोबरला २० वर्षांपासून बेकायदा खाण सुरू या मथळ्याखाली सर्वप्रथम बातमी प्रसारीत करून सरकारला कोट्यवधी रूपयांचा चुना लावणार्‍या वाडा- खडकोणा येथील या बेकायदा दगड खाणीचे प्रकरण उघडकीस आणले होते.या बातमीनंतर खडबडून जागे झालेल्या पालघर महसूल विभागाने त्याच दिवशी वाडा खडकोना येथील सर्वे क्र.७६/२ या जागेवरील बेकायदा दगड खाणीची प्राथमिक पाहणी करून ५७६० ब्रास अनधिकृतपणे दगड उत्खनन केल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -