घरपालघरपाच दिवसांच्या विसर्जनाला कृत्रिम तलावाला पसंती

पाच दिवसांच्या विसर्जनाला कृत्रिम तलावाला पसंती

Subscribe

हे प्रमाण ६२ टक्के एवढे आहे. महापालिकेने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे कुठल्याही प्रकारची गैरसोय झाली नाही तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

वसईः वसई -विरार शहरात ५ दिवसांच्या गणपती आणि गौरींची विसर्जन शनिवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडले. शहरात एकूण १४ हजार ४ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यंदाही नागरिकांनी महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत कृत्रिम तलावात विसर्जन करण्याला पसंती दर्शवली. पाच दिवसांच्या एकूण १४ हजार गणेश मूर्तींच्या विसर्जनापैकी ८ हजार ६११ गणेशमूर्तींचे विसर्जन हे पालिकेने उभारेल्या कृत्रिम तलावात करण्यात आले. हे प्रमाण ६२ टक्के एवढे आहे. महापालिकेने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे कुठल्याही प्रकारची गैरसोय झाली नाही तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

महापालिकेने ठिकठिकाणी तयार केलेल्या ५२ ठिकाणी १०५ कृत्रिम तलाव उभारले होते. कृत्रिम तलावातील विसर्जनात यंदा वाढ झाल्याची दिसून येत आहे. मागीलवर्षी पाच दिवसांच्या एकूण ४ हजार ८२४ गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात झाले होते. यंदा त्यात जवळपास दुप्पट वाढ झाली असून ८ हजार ४४१ घरगुती आणि १७० सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात झाले आहे. वसई विरार शहरात दीड दिवसांच्या गणेशमूर्तीचे ६४ टक्के विसर्जन हे कृत्रिम तलावात झाले होते. विशेष म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रातील इतर महापालिकांच्या तुलनेत सर्वाधिक कृत्रिम तलावांचे विसर्जन हे वसई -विरार महापालिका क्षेत्रात झाले होते.

- Advertisement -

प्रत्येक विसर्जन स्थळावर पालिकेने मंडप उभारून विसर्जनासाठी येणार्‍या भक्तांची सोय करण्यात आली होती. विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले होते. विसर्जनस्थळी दिवाबत्ती तसेच फिरते शौचालय ठेवण्यात आले होते. पालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक येणार्‍या भाविकांची सोय करत होते. त्यामुळे कुठलीही गैरसोय झाली नाही. प्रत्येक विसर्जनस्थळी निर्माल्य कलश ठेवण्यात आला होता. येथे जमा होणार्‍या निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपायुक्त, सर्व प्रभागातील प्रभारी सहाय्यक आयुक्त आणि इतर कर्मचारी विसर्जन व्यवस्थेचे नियंत्रण करत होते.

दगडखाणीतील तलावात विसर्जन

- Advertisement -

कृत्रिम तलावात विसर्जित केलेल्या मूर्ती शेजारील मंडपात ठेवून नंतर पालिकेच्या ५५ ट्रकमधून लगेच दगडखाणी आणि समुद्रात नेऊन विसर्जित करण्यात येत होत्या. यासाठी वसईच्या किल्ला बंदर समुद्रात, विरारच्या नारिंगी येथील म्हारंबळपाडा खाडीत तसेच वालईपाडा आणि राजावली येथील बंद दगडखाणीच्या तलावात सोय करण्यात आली होती. या सर्व विसर्जन प्रक्रियेचे चित्रिकरण करण्यात आले होते. कृत्रिम तलावातून संकलित केलेल्या मूर्तींचे बंद दगडखाणीतील तलावात विसर्जन करण्याची प्रक्रिया रविवारी सकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होती. आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त नानासाहेब कामठे, उपायुक्त समीर भूमकर, प्रभारी सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर हे दगडखाणी आणि समुद्रातील विसर्जनस्थळावर हजर राहून विसर्जनाचा आढावा घेत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -