घरपालघरपिंजाळ नदीशी कुर्लोद ग्रामस्थांची झुंज

पिंजाळ नदीशी कुर्लोद ग्रामस्थांची झुंज

Subscribe

पूल नसल्याने गर्भवतीचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास

मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास ४ ते ५ पाड्यांना जोडणार्‍या पिंजाळ नदीवर पूल नसल्याने येथील ग्रामस्थांना वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव पुन्हा उघड झाले आहे. येथील गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर डोलीतून तिला पुराच्या पाण्यातून न्यावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाड्यातील गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. उपचारासाठी तिला गावाबाहेर न्यावे लागणार होते. नदीला पूर आला होता. तरीही गावकर्‍यांनी तिला डोलीत घालून पुराच्या पाण्यातून वाट काढत रुग्णालयात नेले.

कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील शेंड्याचा पाडा, आंबेपाडा, रायपाडा आणि जांभूळपाडा या पाड्यांमधील नागरिकांना पावसाळ्यात पिंजाळ नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या पाड्यांची लोकसंख्या ५००पेक्षाही अधिक आहे. गावाबाहेर पडण्यासाठी येथील ग्रामस्थांना पिंजाळ नदी पार करावी लागत असून या नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्यातून वाट काढत जाण्याची ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्यात चारही महिने पिंजाळ नदी दुधडी भरून वाहत असून या काळात गावात शिक्षकही पोहचू शकत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशीही खेळ सुरू आहे, तर दुसर्‍या बाजूला गावात कोणी आजारी पडल्यास लाकूड आणि चादरीच्या साह्याने डोली करून येथील रुग्णांना लाकडी फळीच्या आधारावर नदी पार करावी लागते.

- Advertisement -

मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिंजाळ नदीवर पुलाची मागणी होत असून याकडे प्रशासन आणि सरकार मात्र कानाडोळा करीत आहेत. लवकरात लवकर पिंजाळ नदीवर पूल उभारून शेंड्याचा पाडा, आंबेपाडा, रायपाडा आणि जांभूळपाडा या गावांतील नागरिकांना गावाबाहेर पडण्यासाठी दिलासा द्यावा, अशी गावकर्‍यांची मागणी आहे.
– मोहन मोडक, उपसरपंच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -